आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

केपी-२ मुळे करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

हा नवा अवतार किती घातक?

मुंबई : करोनाच्या आठवणी जसजशा धूसर होत जातात, तसतसे करोना विषाणूचे नवीन प्रकार येत जातात. आता करोना विषाणूच्या पुन्हा एका नवीन प्रकारामुळे लोकांची चिंता वाढवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देशाच्या बहुतांश भागांमध्ये, करोना विषाणूच्या जेएन-१ प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली होती. परंतु, आता जेएन-१ प्रकाराचा उपप्रकार केपी-२ जगासह आपल्या देशातही पाय पसरत आहे. अमेरिकेत मार्चमध्ये या विषाणूची केवळ एक टक्का प्रकरणे आढळून आली होती; मात्र आता हा आकडा वेगाने वाढत आहे. कालच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातही या उपप्रकाराचे ९१ रुग्ण आढळून आले आहेत. हा विषाणू चिंतेचे कारण ठरू शकतो का? या विषाणूमुळे मृत्यूचा धोका किती आणि याची लक्षणे काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

केपी-२ हा विषाणू करोना प्रकारांच्या उपसंचातीलच आहे; ज्याला शास्त्रज्ञांनी त्याच्या उत्परिवर्तनाच्या नावातील अक्षरांवरून ‘FLiRT’ असे टोपणनाव दिले आहे. केपी-२ हा विषाणू ओमिक्रोन जेएन-१ विषाणूचा उपप्रकार आहे, असे कोलंबिया विद्यापीठातील विषाणू तज्ज्ञ डॉ. डेव्हिड हो म्हणाले. हो यांनी पेशींच्या प्रयोगशाळेत यासंबंधीच्या चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांमधून हे स्पष्ट झाले आहे, की जेएन-१ विषाणूच्या तुलनेत केपी-२ विषाणू अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूने डोके वर काढले असले तरी अद्याप हा विषाणू वेगाने पसरलेला नाही. परंतु, उन्हाळ्यात या विषाणूमुळे करोनाग्रस्तांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता संशोधक आणि चिकित्सकांनी वर्तवली आहे. जेएन-१ नंतर आता केपी-२ मुळे करोना संसर्ग वाढला आहे.

नव्या विषाणूचा प्रसार
जेएन-१ नंतर आता केपी-२ विषाणूमुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते की नाही, हे पाहण्यासाठी काही आठवडे लागतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांनी हेही नमूद केले की, विषाणूचा प्रसार कसा होत आहे, याबद्दल अद्याप पुरेशी माहिती नाही. कारण- सार्वजनिक आरोग्य संकट संपल्यामुळे प्रकरणांची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. डॉक्टरांनी सांगितले की, अतिशय कमी संख्येने लोक आता करोना चाचणी करीत आहेत.

डॉक्टर सांगतात, रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांकडील माहितीतून असे लक्षात येते की, सांडपाण्यात असणार्‍या या विषाणूची पातळी अगदी कमी आहे. मार्चच्या सुरुवातीपासून एप्रिलच्या अखेरपर्यंत तर रुग्णालयात दाखल केल्या जाणार्‍या आणि विशेषतः आपत्कालीन विभागात दाखल केल्या जाणार्‍या प्रकरणांची संख्या कमी आहे. व्हेटर्न्स अफेअर्स सेंट लुईस हेल्थकेअर सिस्टीमचे संशोधन आणि विकास प्रमुख डॉ. झियाद अल-अली म्हणाले, “आम्ही हे म्हणणार नाही की, आम्हाला या विषाणूबद्दल सर्वच माहीत आहे. परंतु, आतापर्यंत केलेल्या निरीक्षणानुसार हे नक्की सांगता येईल की, यामुळे मोठे संकट उदभवण्याची शक्यता कमी आहे.”

लस आणि संक्रमण
तज्ज्ञांनी सांगितले की, तुम्हाला जेएन-१ ची लागण झाली असेल तरी केपी-२ ची लागण पुन्हा होऊ शकते. विशेषतः जर तुम्हाला करोनाचा संसर्ग होऊन महिने किंवा त्याहून जास्त काळ झाला असेल. केपी-२ ची लागण लस घेतलेल्यांनाही होऊ शकते, असे डॉ. डेव्हिड हो यांनी सांगितले. जपानमधील संशोधकांनी एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेल्या पेपरच्या सुरुवातीच्या आवृत्तीत असे स्पष्ट की, नुकतच करोना लस घेतलेल्या लोकांना जेएन-१ पेक्षा केपी-२ विषाणू संक्रमित करत आहे. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (सीडीसी)च्या एका प्रवक्त्याने सांगितले की, केपी-२ विरुद्ध लस नक्की कसे कार्य करते यावर यंत्रणेचे लक्ष आहे. डॉक्टरांनी हेही स्पष्ट केले की, पूर्वीच्या संसर्गाप्रमाणे यावरदेखील लस काही प्रमाणात संरक्षण प्रदान करू शकते.

पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, पूर्वीपासून एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती यांना केपी-२ विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. या विशेष वर्गातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि अद्याप लसीचा एखादा डोस घ्यायचा राहिला असेल, तर तो तातडीने घेणे आवश्यक आहे, असे सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. पीटर चिन-हॉन्ग यांनी सांगितले. ते म्हणाले की, जरी अद्याप या विषाणूमुळे कुणाचा मृत्यू झाला नसेल, तरी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

नव्या विषाणूची लक्षणे
डॉक्टरांनी सांगितले की, जेएन-१ प्रमाणेच केपी-२ विषाणूची लक्षणे आहेत. आतापर्यंत दोन्ही प्रकारांमुळे १६ टक्के प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. इतर करोना प्रकारातील लक्षणांप्रमाणेच यामध्येही घसा खवखवणे, नाक वाहणे, खोकला, डोके व शरीर दुखणे, ताप, थकवा आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यात अडथळा येणे अशा लक्षणांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button