क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

खेलो इंडिया युवा स्पर्धा: महाराष्ट्राची आज पदकांची शंभरी पूर्ण

दिवसभरात कुस्ती, जलतरण आणि नेमबाजीत एकून १२ पदके : एकाच दिवसात जलतरणात तब्बल ७ पदके

चेन्नई : हर्षल देशपांडे

महाराष्ट्राच्या खेळाडूनी आज देखील आपली क्षमता दाखविताना जलतरण, कुस्ती, नेमबाजी या खेळांत पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणमध्ये ७, कुस्तीमध्ये ४ तर नेमबाजीमध्ये १ असे तब्बल १२ पदके जिंकताना पदकांची शंभरी ओलांडली. महाराष्ट्राच्या पदकतक्त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून हरयाणा आणि तामिळनाडू यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी लढत सुरु आहे.

जलतरणामध्ये आदिती हेगडेला ‘डबल’ सुवर्णपदक, दिवसभरात सात पदकांची कमाई ; रिले शर्यतीतही महाराष्ट्राला विजेतेपद

मुलींच्या शंभर मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत आदिती हेगडे हिने सुवर्णपदक जिंकून यंदाच्या या स्पर्धेतील पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने ही शर्यत एक मिनिट ४.७८ सेकंदात पूर्ण केली. त्याआधी तिने ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. तिला हे अंतर कापण्यासाठी चार मिनिटे ३९.७० सेकंद वेळ लागला. आदिती हिने महाराष्ट्राला आज चार बाय शंभर मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळवून दिले. तिने दिवा पंजाबी,राघवी रामानुजन, अलीफिया धनसुरा यांच्या साथीत सुवर्णपदक पटकाविताना चार मिनिटे ८.६१ सेकंद वेळ नोंदवली. या शर्यतीत अगोदर कर्नाटकला विजेतेपद देण्यात आले होते मात्र त्यांच्या खेळाडूंनी लवकर प्रारंभ केला म्हणून त्यांना अपात्र ठरविण्यात आले व महाराष्ट्राला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. कालही तिने एका रौप्य पदकाची नोंद केली होती. १०० मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या प्रतिष्ठा डांगी हिने रुपेरी यश संपादन केले त्यावेळी तिने हे अंतर एक मिनिट ८.०२ सेकंदात पार केले.‌

मुलांच्या गटात श्लोक खोपडे याने दोनशे मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले. ही शर्यत त्याने दोन मिनिटे २५.०४ सेकंदात पार केली. ऋषभ दास याने महाराष्ट्रासाठी आणखी एक पदकाची नोंद करताना शंभर मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. हे अंतर त्याने ५७.६८ सेकंदात पूर्ण केले. पंधराशे मीटर्स फ्रीस्टाइल शर्यतीत अथर्व राज पाटील याने कांस्यपदक जिंकताना १६ मिनिटे २०.४१ सेकंद वेळ नोंदविली.

चीतपटने बीडच्या सुमीत ने जिंकले सुवर्ण

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्ती आखाड्यात महाराष्ट्रासाठी सलग दुसरा दिवस सुवर्णदिन ठरला. बीडच्या सुमीतकुमार भारस्करने ७१ कि. वजनी गटात अवघ्या २७ सेकंदात चीतपट कुस्ती करीत सोनेरी यशाला गवसणी घातली.

अंतिम लढतीत दिल्लीच्या शुभमकुमारने २ गुणांची आघाडी घेतली होती. सुमीतने हुकमी बगल डावावर चिवट प्रतिकार करीत शुभमला आस्मान दाखवले. सुमीत पुण्यातील अमोल बुचडे अ‍ॅकॅडमीत सराव करतो. गत स्पर्धेत त्याने ग्रीकोरोमन प्रकारात सुवर्ण पदकाची बाजी मारली होती. दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला कुस्तीगीर ठरला आहे.

वैष्णवला रौप्य, आहिल्या, तुषारला कांस्य

ग्रीकारोमन ६५ किलो गटात पुण्याच्या वैष्णव आडकरने अंतिम फेरीत मजल होती. त्याला पंजाबच्या सागरसिंगने पराभूत केले. रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेला वैष्णव पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात मेहनत घेतो. याच गटातील कांस्यपदकावर महाराष्ट्राच्या तुषार पाटीलने नाव कोरले. त्याने उत्तरप्रदेशच्या नीरज यादवचा ११-० गुणांनी एकतर्फी पराभव करीत पदक पटकावले.

मुलींच्या कुस्तीत महाराष्ट्राला पहिले यश गवसले. ६१ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदेने २४ सेकंदात चीतपट कुस्ती करीत कांस्यपदक जिंकले. पुणे जिल्ह्यातील इंद्रापूरमधील अहिल्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने तिने रिपॅचेस फेरीत पदकाचा गड सर केला. पदकविजेत्या कुस्तीगीरांचे महाराष्ट्राचे पथकप्रमुख विजय संतान, अरूण पाटील, प्रशिक्षक शिवाजी कोळी, दत्ता माने, संदिप वांजळे व शबनब शेख यांनी अभिनंदन केले आहे.

टेबलटेनिसमध्ये महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र लढत रंगणार

टेबलटेनिसच्या मुलीच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचा व रिशा मीरचंदानी यांनी हरयाणाच्या सुहाना सैनी व प्रितोकी चक्रवर्ती यांच्या जोडीला ११-६, ११-५, १२-१० असे एकतर्फी पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पृथा वर्टीकर आणि सायली वाणी यांच्या जोडीने पश्चिम बंगालच्या सेन्ड्रीला दास, शुभंक्रिता दत्ता यांच्या जोडीला ७-११, ११-५, ११-८, ८-११, ११-९ असे पराभूत करताना अंतिम फेरी गाठली. यामुळे मुलीच्या दुहेरी गटाची लढत महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशीच असणार असल्यानेच महाराष्ट्राला मुलींच्या दुहेरीत १ सुवर्ण आणि १ रौप्य निश्चित झाले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये साईराज परदेशी याचा राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णवेध

महाराष्ट्राच्या साईराज परदेशी याने अतिशय आत्मविश्वास दाखवीत मुलांच्या ८१ किलो गटात राष्ट्रीय विक्रम नोंदवित सोने लुटले. मात्र महाराष्ट्राच्या भूमिका मोहिते हिला वेटलिफ्टिंगमधील ५९ किलो वजनी गटात सोनेरी यश साधता आले नाही.‌ तिला रौप्य पदक मिळाले.

साईराज याने स्नॅच प्रकारामध्ये १२४ तर क्लीन व जर्कमध्ये १६२ किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये त्याने मध्यप्रदेशचा खेळाडू अजय बाबू याने गतवर्षी नोंदविलेला १६१ किलो हा राष्ट्रीय विक्रम मोडला. स्नॅच प्रकारामध्ये पहिल्या दोन्ही प्रयत्नांमध्ये साईराज याला वजन उचलता आले नव्हते.‌ तथापि तिसऱ्या प्रयत्नात त्याने १२४ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात १५३ किलो वजन उचलून त्याने झकास सुरुवात केली. त्यानंतर १५९ किलो व १६२ किलो असे वजन उचलून त्याने सोनेरी पदकावर नाव कोरले.

साईराज हा मूळचा मनमाड येथील खेळाडू असेल प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. गेली तीन वर्षे तो संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात तृप्ती पराशर व विजय रोहिला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तो सामान्य कुटुंबातील खेळाडू असून त्याची बहीण पूजा व भाऊ जयराज हे देखील राष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत. तो सध्या मनमाड येथील सप्रे विद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत आहे. गतवेळी त्याने कास्यपदक मिळवले होते तसेच त्याने अरुणाचल प्रदेश मध्ये झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक तर कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. सुवर्णपदक मिळविण्याबरोबरच राष्ट्रीय विक्रम नोंदवण्याचे ही माझे ध्येय होते आणि हे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे साईराज याने सांगितले.

वेटलिफ्टिंगमध्ये भूमिका मोहितेचे सुवर्णपदक हुकले, रौप्य पदकावर समाधान

भूमिका हिला ५९ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.‌ तिने स्नॅच या प्रकारामध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्क मध्ये ९७ असे एकूण १७२ किलो वजन उचलले. क्लीन व जर्क मध्ये जर तिने शेवटच्या प्रयत्नात १०१ किलो वजन उचलले असते तर तिला सुवर्णपदक मिळाले असते. उत्तर प्रदेशच्या सगुणा राव १७५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

भूमिका ही कुरुंदवाडजवळील खेरवाड या गावातील खेळाडू असून तिला प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिने अरुणाचल प्रदेश मध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.‌ गेली पाच वर्षे ती वेटलिफ्टिंग मध्ये करिअर करीत असून सध्या ती एस. के.पाटील महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. तिने जागतिक युवा स्पर्धेत चौथे स्थान मिळविले होते. तिच्या वडिलांचा दुग्ध व्यवसाय असून तिला या खेळासाठी पालकांचे भरपूर सहकार्य मिळत आहे.

नेमबाजीत ईशाचे लक्षवेधी दुसरे सुवर्ण

चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील १० मीटर एयर रायफल प्रकारात अखेरच्या क्षणापर्यंतरंगलेल्या चुरशीच्या लढतीत ८ गुणांनी महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळेने सुवर्णपदक खेचून आणले.

गुरुनानक महाविद्यालयच्या शूटिंग रेंजवर तुल्यबळ असणाऱ्या मध्यप्रदेशच्या गौतमी भानोतने ईशाला अंतिम फेरीत झुंजविले. अखेर लौकिकास साजेसा खेळ करीत महाराष्ट्राच्या ईशाने २५३.८ गुण मिळविताना पदकाची बाजी मारली. गौतमीने २५३ गुणांसह रौप्य पदक राखले. कर्नाटकच्या अनुष्काला कांस्यपदकवर समाधान मानावे लागले. चेन्नईतील स्पर्धेत पार्थ माने सोबत खेळताना तीने मिश्र दुहेरीतही सुवर्ण पदक पटकावले होते.

ईशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धामध्ये दमदार कामागिरी केली असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ऑलिम्पियन सुमा शिरूर यांच्या मुंबईतील लक्ष्य अकादमीत सराव करते. अमरावतीमध्ये सहाव्या वर्षापासून खेळाचा श्री गणेशा करणाऱ्या ईशाने चार आंतरराष्ट्रीय पदके जिंकली असून युवा स्पर्धेत तिने विक्रमाची नोंद केली आहे. ईशाने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडियात पदकाचा करिश्मा घडविला.

टेनिसच्या दुहेरीत मुले व मुली दोघेही उपांत्य फेरीत

चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या दुहेरीत सोनल पाटील व ऐश्वर्या जाधव यांच्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी दिल्लीच्या रिया सचदेव व याशिका यांना ६-३, ६-० असे पराभूत केले. सुरुवातीपासून दोघींनी आक्रमक खेळ करताना दिल्लीच्या खेळाडूंना पुनरागमनाची संधीच दिली नाही. लढतीमध्ये सोनल आणि ऐश्वर्या यांनी जबरदस्त समन्वय राखताना दिल्लीच्या रिया आणि याशिका यांना जखडून ठेवले.

महाराष्ट्राच्या रुमा गायकायवारी व अस्मी अडकर यांनी टायब्रेकरमध्ये तामिळनाडूच्या दिया रमेश व श्री शैलेश्वारी यांना ६-१, ७-६ (७-३) पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. रुमा व अस्मी यांनी आजच्या लढतीत जबरदस्त खेळ केला. यामुळे तामिळनाडूचे दोन्ही खेळाडू निष्प्रभ झाले.

मुलांच्या गटात काहीर वारीक व तनिष्क जाधव यांना पुढची चाल मिळाल्याने त्यांनी थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांची लढत दिल्ली व उत्तर प्रदेश यांच्या लढतीच्या विजेत्याबरोबर होणार आहे.

टेबलटेनिसमध्ये पृथा, सायली, रिशा यांची उपांत्य फेरीत धडक

मुलींच्या एकेरीत पृथा वर्टीकर, सायली वाणी व रिशा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्याना पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे महाराष्ट्राला टेबलटेनिसमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य असे तीनही पदक मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पृथा वर्टीकरने हरयाणाच्या सुहाना सैनीला १२-१०, ६-११, १०-१२, ११-३, ११-६ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतितटीच्या या लढतीमध्ये पृथाने शेवटी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना सुहानाला पराभूत केले. महाराष्ट्राच्या सायली वाणीने पश्चिम बंगालच्या सौमित्रा दत्ताला ११-८, ११-३, ११-९ तर रिशा मीरचंदानीने तामिळनाडूच्या काव्यश्री भास्करला ११-९, ५-११, ११-५, ११-५ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्राच्या तानिशा कोटेला मात्र पश्चिम बंगालच्या नंदिनी शहा हिच्याकडून ११-७, ८-११,१०-१२, १०-१२ असा पराभव स्वीकारावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button