Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

काँग्रेसमध्येही खदखद; असंतुष्ट राजीनाम्याच्या तयारीत, सोनिया गांधींचीही भेट घेणार

नागपूर: प्रदेश प्रतिनिधींच्या निवडीवरून काँग्रेस असंतुष्टांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांना येत्या शुक्रवारी भेटण्याची तयारी त्यांनी केली असून, वेळप्रसंगी पदाधिकारीपदाचा राजीनामा देण्याचा निर्धार केला आहे.

प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधींची संकेतस्थळावरील एक यादी व्हायरल झाली. नागपुरातील यादी बाहेर येण्यापूर्वीच शनिवारी नावांवर वाद सुरू झाला. यानंतर असंतुष्टांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या गटाची सोमवारी दुपारी सुमारे दीड तास आमदार निवासात बैठक झाली. माजी आमदार एस. क्यू. जमा अध्यक्षस्थानी होते. शहरातील प्रमुख नेत्यांची नावे नसल्याने पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात येणार आहे. कोणत्याही निवडणूक प्रक्रियेविना प्रदेश प्रतिनिधींची निवड लोकशाही विरोधी व निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

एकाच घरातून दोन सदस्य प्रदेशवर पाठवले. निष्ठावान, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षात अलीकडे सक्रिय झालेल्यांना संधी दिल्याचा रोष व्यक्त करण्यात आला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आहे. त्यामुळे २२ तारखेला दिल्लीत वेळ घेऊन भेटण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्यास राजीनामा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. अर्थात सोनिया गांधी यांच्यासंदर्भात काय घडामोडी होतात, त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आशीर्वादाने शहरातील काही नेते पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही करण्यात आला. दिल्लीत पक्षाचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री व अन्य नेत्यांचीही भेट घेऊन न्याय मागण्याचे ठरले.

सेवादलाचे के.के. पांडे, हुकुमचंद आमधरे, चंद्रपाल चौकसे, प्रदेश सरचिटणीस तानाजी वनवे, संजय दुबे, झिया पटेल, आर.एम. खान नायडू, कमलेश समर्थ, शकूर नागाणी, किशोर जिचकार, विलास भालेकर, वसंत गाडगे, मोहम्मद कलाम, संजय कडू आदी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, नरेंद्र जिचकार, हैदरअली दोसानी यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. देशमुख यांची सहभागी होण्याची तयारी होती तर, जिचकार मुंबईत होते.

चुकीचा पायंडा पडत असल्याने…

पक्षात चुकीचा पायंडा पडत असल्याने असंतुष्टांसोबत असल्याची ग्वाही एस. क्यू. जमा यांनी दिली. पक्षात बरोबर चाललेले नाही. संघटन बळकट करण्याऐवजी कमकुवत केला जात आहे. त्यामुळे निष्ठावानांना न्याय न मिळाल्यास माझ्यासह बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचे कमलेश समर्थ यांनी ‘मटा’शी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button