breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेवर गंभीर आरोप; म्हणाले, “निवडणुका आल्या की मनमानी पद्धतीने…”

मुंबई |

महाविकास आघाडीमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सध्या जुंपण्याची चिन्हं आहे. यामागील कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला जाहीर इशारा दिला आहे. मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतलं जाणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपा आम्हाला फार लांब नाही असा सूचक इशाराही दिला. ते नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शरद पवारांनी खासगीत सांगितलं असल्याचा खुलासाही केली. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

  • शरद पवारांनी खासगीत काय सांगितलं –

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शरद पवारांनी खासगीत सांगितलेल्या गोष्टीचा खुलासा केला. आपल्या मित्रांसोबत बोलताना २०२४ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असल्याचं ते म्हणाले आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

  • शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही

“शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो, त्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते, असं बाहेर पसरवलं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसून उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे,” असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

  • शिवसेनेवर टीका

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. “निवडणुका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

  • …खपवून घेतलं जाणार नाही

शिवसेना मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात आदर करु, मात्र बोलायचं एक आणि करायचं एक हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला. “आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची, मात्र तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button