breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

‘जगताप पॅटर्न’ : चिंचवडमध्ये शंकर जगताप भाजपासाठी  ‘संकटमोचक’!

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

राज्यातील पोटनिवडणूक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट सुरू असताना चिंचवडमध्ये केवळ ‘जगताप पॅटर्न’मुळेच पक्षाची पत राहिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अचूक नियोजन करीत महाविकास आघाडीचे तगडे आव्हान रोखले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय सोपा झाला. त्यामुळे शंकर जगताप भाजपासाठी ‘संकटमोचक’ ठरले आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनापूर्वी त्यांच्यावर सुमारे दोन वर्षे रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. या काळात वैद्यकीय तज्ञांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर जगताप यांना मतदार संघात बाहेर पडता आले नाही. या काळात भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांचे लहान बंधू उद्योजक शंकर जगताप यांच्या खांद्यावर चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर शंकर यांनी मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली. दि. ३ जानेवारी २०२३ रोजी लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यावेळी कुटुंबाला सावरण्याची मोठी जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर पडली.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपामधील नाराज आणि जगताप विरोधी गट राष्ट्रवादीच्या संपर्कात होता. संभाव्य मोठी फूट लक्षात घेवून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली. जगताप विरोधी गटाचा विरोध थोपवणे आणि बंधू लक्ष्मण यांच्या निधनानंतर महिन्याभरात निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान शंकर जगताप यांच्यासमोर आले होते. 

निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच भाजपाची उमेदवारी शंकर जगताप यांना दिली जाईल, अशी चर्चा होती. त्याबाबत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून एकमतही झाले होते. तसेच, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रदेश-स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, निवडणूक लागली. महाविकास आघाडीने माघार घेतली नाही. त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात भाजपासह कुटुंबांचा लौकीक टिकवण्यासाठी शंकर जगताप यांनी अक्षरश: जीवाचे रान केले आणि विजयश्री खेचून आणली.

विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले होते. ‘‘चिंचवडमध्ये जगताप पॅटर्न चालतो…त्या ठिकणी लोकांनी भाजपाला नव्हे, तर जगताप कुटुंबियांना मते दिली आहेत.’’ असे जाहीरपणे वक्तव्य राऊत यांनी केले. त्यामुळे ‘जगताप पॅटर्न’ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. 

काय आहे ‘जगताप पॅटर्न’

दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी तब्बल २० वर्षे पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या नेतृत्वाचा करिष्मा कायम ठेवला आहे. किंबहुना, भारतीय जनता पार्टीचा शहरातील सत्तेचा मार्ग सोपा करण्यात जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. महापालिकेतील सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात जगताप यांनी अपवाद वगळता अनेक समर्थकांना महत्त्वाची पदे दिली आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये जगतापांचा कट्टर समर्थक आहेत. यासह राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय काही मान्यवर जगताप यांच्यासाठी अप्रत्यक्ष काम करीत असतात. केलेली विकासकामे आणि मतांची अचूक गोळाबेरीज याचा जगताप यांना कायम फायदा होतो. साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व आयुधांचा वापर करुन जगताप या मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट राहिले आहेत. त्यांच्याच तालमीत तयार झालेले शंकर जगताप आहेत. माजी नगरसेवक म्हणून त्यांनी पाच वर्षे सभागृहात कामकाज केले आहे. यासह अत्यंत शांत, संयमी आणि तितकेच अभ्यासू असलेले शंकर जगताप यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या यंत्रणेतील ‘बॅक बोन’ म्हणून त्यांचा मतदार संघातील बारीक-सारीक गोष्टींत अप्रत्यक्ष निर्णायक हस्तक्षेप असतो. हाच अनुभव शंकर जगताप यांच्या कामाला आला आणि निर्णायक मताधिक्य घेण्यात शंकर जगताप यशस्वी झाले. परिणामी, अश्विनी जगताप या ३६ हजारहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

राष्ट्रवादी अन्‌ महाविकास आघाडीचे बुरूज असे ढासळले…

चिंचवडमधील एकूण १३ प्रभागांमध्ये शंकर जगताप यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली होती. वास्तविक, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव हा परिसर जगताप यांचा प्रभावक्षेत्र राहिले आहे. रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, पुनावळे, वाल्हेकरवाडी यासह थेरगाव, रहाटणी या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव मोठा आहे. या भागातून राष्ट्रवादीचे मताधिक्य रोखण्यात शंकर जगताप आणि टीम यशस्वी झाली. राष्ट्रवादीचे दिग्गज नगरसेवक असलेल्या रावेत, किवळे मामुर्डी भागात सर्वाधिक तब्बल ११ हजार ६३७ मते अश्विनी जगताप यांना मिळाली आहेत. मतमोजणीत या भागातून घेतलेली आघाडी भाजपाने शेवटपर्यंत ठेवली. तसेच, पिंपळे निलख, वाकड, वेणू नगर, कस्पटेवस्ती, विशालनगर या भागात महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान होईल, असा दावा केला जात होता. मात्र, या ठिकाणी ११ हजार ४७५ अशी सर्वाधिक मते भाजपाला मिळाली आहेत. रहाटणी, काळेवाडी आणि पिंपळे सौदागर हा महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे प्रभावक्षेत्र वगळता गेल्या पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या भागात भाजपाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीबहुल भागात सूक्ष्म नियोजन करुन एक-एक मत गोळा करण्यासाठी शंकर जगताप यांनी भाजपासोबत स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली होती. त्यामुळेच राष्ट्रवादीचे बुरूज ढासळले. त्याचा फायदा भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना झाला. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजुने झुकलेली असताना भाजपाचे ‘संकटमोचक’ बनून शंकर जगताप यांनी निर्णायक विजय मिळवला, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button