breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का?; मद्यधुंद चालकावरुन पडळकरांचा थेट अजित पवारांवार निशाणा

मुंबई |

राज्यात मोठ्या शहरांमध्ये ओला-उबेरच्या माध्यमातून प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा सेवेला पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चारचाकी किंवा रिक्षासेवेनंतर आता दुचाकीवरुन ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ओला उबेरची दुचाकी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी यामध्ये गैरप्रकार दिसून येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशाच एका दुचाकी सुविधा देणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकरांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओ पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. अशी सेवा पुरवणाऱ्या एका दुचाकी चालकाचा हा व्हिडीओ आहे. या चालकाने मद्यप्राशन केल्याचा दावा व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. हा चालक दारूच्या नशेत असून त्याच्या हातात दारूची बाटलीही दिसत आहे. हा चालक खिशात दारुची बाटली ठेवून प्रवाशांना नेत असल्याचा दावाही संबंधित व्यक्तीने केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी हा व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. ओला, उबेर, रेपिडो, झूम अशा ॲपचा वापर करून सर्रास अवैधरित्या दुचाकी टॅक्सी म्हणून दुरूपयोग केला जातोय. मात्र हजारोचा टॅक्स भरणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांच्या पोटावर लाथ मारली जातेय, असे पडळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“परिवहन मंत्री अनिल परब व पालकमंत्री अजित पवार हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का? वसूलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय, आंदोलनाशिवाय यांचा नशा उतरणार नाही का?” असा सवालही पडळकर यांनी विचारला आहे.

दरम्यान, आधी गोपीचंद पडळकरांनी राज्यातील वाइन विक्रीवरुन सरकारवर निशाणा साधला होता. टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो असे, गोपीचंद पडळकर म्हणाले होते. “जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भीतीपोटी की ते परदेशात वाइन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. गावच्या गावे अंधारात लोटली गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. तसेच जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही हे तुम्ही नमूद करणार का? टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button