ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

मुक्ताईनगर शासकीय गोदामात निकृष्ट धान्य घोटाळा; नागरिकांना वाटपासाठी चक्क सडलेली ज्वारी

जळगाव| मुक्ताईनगरातील शासकीय गोदामात नागरिकांना वाटपासाठी गुरेही खाणार नाही अशी चक्क सडलेली ज्वारी आढळून आली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अचानक भेट देवून पाहणी करत हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आणला. यावेळी तहसीलदारांना चांगलेच खडे बोल सुनावत धारेवर धरले. आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना तहसीलदारांची चांगलीच धांदल उडाली. काही नागरिकांना या सडलेल्या व निकृष्ट ज्वारीचेही वाटपही करण्यात आले असल्याची माहिती समोर आले असून प्रकारानंतर वितरण थांबविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकाराने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी अचानक शहरातील शासकीय गोदामाला भेट देत शासकीय गोदामातील मालाची तपासणी केली यादरम्यान नागरिकांना वाटपासाठी आलेली ज्वारी अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे म्हणजेच सडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. ४२० क्विंटल ज्वारी अशाच प्रकारचे निकृष्ट असल्याचे समोर आले.

आमदारांनी प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदार श्वेता संचेती यांना बोलाविण्यात आले. आमदारांनी तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार करत तहसीलदारांची चांगलीच कानउघाडणी केली. डिसेंबर महिन्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे भरडधान्य योजनेच्या माध्यमातून ज्वारी खरेदी करण्यात आली होती. चारच महिन्यांमध्ये ज्वारी सडून कशी गेली? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आमदारांची कारवाईची मागणी…

मुक्ताईनगर तालुका आणि शहरासाठी ४२० क्विंटल ज्वारी रेशन दुकानाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार होती. ही ज्वारी निष्कृष्ट दर्जाची असल्याने तात्काळ वितरण करणे थांबवण्याचे विनंतीही आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांकडे केली. शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रतीची ज्वारी खरेदी केली असता या ठिकाणी मालाची अदलाबदल करून निकृष्ट दर्जाचा माल वितरण केला जात आहे. यातील घोटाळेबाजांना कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

काय म्हणाल्या तहसीलदार…

२० एप्रिल रोजी हे धान्य शेतकी संघाच्या नियंत्रणात शासकीय गोदामात आले. त्यानंतर काही नागरिकांना या धान्याचे वाटपही झाले आहे. मात्र, आमदारांच्या पाहणीनंतर धान्याचे वाटप थांबविण्यात आले आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांच्या विशेष पथकामार्फत चौकशी केली जाणार असून तपासणी अंती त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार श्वेता संचेती यांनी बोलतांना सांगितले.

एकीकडे निकृष्ट धान्याचे वाटप करुन नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असतांना दुसरीकडे प्रशासनाला या प्रकाराची माहिती का मिळाली नाही? की माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठ्याप्रमाणावर निकृष्ट धान्याचे वाटप होवून मोठा धान्य घोटाळा झाल्याची शक्यता आहे. आमदारांच्या पाहणीनंतर हा प्रकार उघड झाला खरा मात्र, आता याप्रकरणात नेमकी कुणावर व काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button