breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsAUS: भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळे के एल राहुल मायदेशी

सिडनी – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सिडनी कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघ तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असतानाच फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुल याला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती.

बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. ‘शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के एल राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. यष्टीरक्षक आणि फलंदाज के एल राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल’, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. तसेच तो आता भारतात परतणार असल्याचेही बीसीसीआयने म्हटले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दुखापतीमुळे मायदेशी परतणारा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादवही दुखापतीमुळे भारतात आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात के एल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. तिसऱ्या कसोटीत त्याची निवड होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच त्याला दुखापतीने ग्रासल्याने तो मालिकेतूनच बाहेर पडला आहे. कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियात खेळलेल्या टी ट्वेण्टी आणि वन डे मालिकेत राहुल भारतीय संघात होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यात त्याने 93 धावा केल्या होत्या, तर 3 टी ट्वेण्टी सामन्यात एका अर्धशतकासह 81 धावा केल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button