TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

भारताला आत्मविश्वास उंचावण्याची गरज!

विशेष लेख:
सुनील शाळगावकर
क्रिकेट प्रशिक्षक
9850217509

सेंट जॉर्जेस पार्क येथे झालेल्या साखळी सामन्यात इंग्लंडने भारताचा बारा धावांनी पराभव करून गटात आपले अव्वल स्थान निश्चित केले. शानदार सुरुवातीनंतर भारताने सामन्या वरची पकड ढिली केली. स्मृती मंधना आणि रिचा घोष यांना इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारताला पराभव पत्करावा लागला.

सेंट जॉर्जेस पार्कच्या ढगाळ आणि ओलसर वातावरणात हरमन प्रीत ने नाणेफेक जिंकून अपेक्षाप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रेणुका ठाकुर ने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन करताना तीन बळी झटक्यात टिपले आणि हर्मानप्रीत चा निर्णय सार्थ ठरवला. काहीशा ओलसर खेळपट्टीवर शिखा पांडे आणि पूजा वस्त्रकर ने तिला तोलामोलाची साथ दिली. जलद गती गोलंदाजांनी इंग्लंडला अडचणीत आणले मात्र फिरकी गोलंदाजांनी नंतर निराशा केली. राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादवची डावखुरी फिरकी अत्यंत प्रभावहीन ठरली. मध्येच शफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा निर्णय चांगलाच अंगलट आला. इंग्लंडकडून नताली स्कवर ने पन्नास धावा तर अमी जोन्स ने चाळीस धावांचे बहुमूल्य योगदान दिले आणि इंग्लंडला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला.

एकशे बावन्न धावांच्या आव्हानासमोर स्मृती आणि शफाली ने जोरदार सुरुवात केली. मात्र धावांची गती वाढवण्याच्या नादात प्रथम शफाली नंतर जेमिमा आणि त्यानंतर हर्मानप्रीत अत्यंत खराब फटके मारून स्वस्तात बाद झाल्या. दुसऱ्या बाजूला स्मृतीने मात्र काही नजाकतदार फटके मारून धावफलक हलता ठेवला आणि अर्धशतक झळकावले. शेवटी आवश्यक धाव गती अवाक्य बाहेर गेल्याने मोठे फटके मारण्याच्या नादात तीही आपली विकेट गमावून बसली. रिचा घोष ने नेहमीप्रमाणे जबाबदारी ओळखून आक्रमक फलंदाजी ला सुरुवात केली, परंतु तोपर्यंत धावागती आवाक्या बाहेर गेली होती. तिचे शर्थीचे प्रयत्न अखेरीस अपुरे ठरले आणि भारताला बारा धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडकडून विशेषतः फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करून भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले.

बलाढ्य संघाविरुद्ध दबावाखाली भारतीय फलंदाजी कोलमडते हे आज पुन्हा एकदा दिसून आले. स्मृति मंधना आणि रिचा घोष चा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली. भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध दबाव झुगारून कामगिरी करावी लागेल. मेघना ठाकूर आणि दीप्ती शर्मा चा अपवाद वगळला तर भारतीय गोलंदाजांना भरपूर सुधारणा करावी लागेल. फलंदाजीत शफाली वर्मा जमीमा रोड्रीग्स आणि हार्मनप्रीत यांना बलाढ्य संघाविरुद्ध निर्णायक योगदान द्यावे लागेल. भारताची लढत आता उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध होण्याची शक्यता जास्त आहे. ऑस्ट्रेलियाला नमवण्यासाठी भारताला मानसिक कणखरता दाखवावी लागेल तसेच खेळही कमालीचा उंचावावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button