TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ऑक्टोबरमधील नुकसानग्रस्तांनाही वाढीव मदत ; मंत्रिमंडळाचा निर्णय – महिनाभरात २५ लाख हेक्टर शेतीला फटका

मुंबई : राज्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे सुमारे २५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. ऑक्टोबरमधील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही निकषापेक्षा अधिक वाढीव मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५ हजार ८४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे ४७०० कोटींची मदत देण्यात आली आहे. ही मदत ‘एनडीआरएफ’च्या निकषापेक्षा दुपटीने जास्त आणि दोनऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव देण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्येही राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबरमधील पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती. मात्र सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, असे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमुन्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button