breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समाविष्ट गावांना नोव्हेंबरअखेर आंद्राचे पाणी मिळणार, प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर!

उपमहापौर हिराबाई घुले यांच्याकडून चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची  पाहणी

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. तळवडेतील जॅकवेलचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्प पूर्णत्वाचे दिशेने जात असून पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. नोव्हेंबरअखेर समाविष्ट गावांतील लोकांना आंद्रा धरणाचे पाणी मिळेल. नागरिकांची तहान भागेल, असा विश्वास उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात भामा-आसखेडचे पाणी उपलब्ध झाल्यावर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेवरील ताण कमी होईल. संपूर्ण शहराला सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा होईल, असेही त्या म्हणाल्या.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्यात येणार आहे. सुरुवातीला आंद्रा धरणाचे पाणी मिळणार आहे.  पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची उपमहापौर हिराबाई घुले यांनी आज (शुक्रवारी) पाहणी केली. काम वेगात पूर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. कामाची प्रगती पाहून नोव्हेंबरअखेर आंद्राचे पाणी उपलब्ध होईल असा विश्वास उपमहापौर घुले यांनी व्यक्त केला. माजी उपमहापौर केशव घोळवे, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले,  पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत उपस्थित होते.
उपमहापौर घुले म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी कोटा आरक्षित आहे. अशुद्ध जलउपसा करण्यासाठी धरणापासून नवलाख उंब्रे येथील नियोजित ब्रेक प्रेशर टँक पर्यंत 1700 मि.मी व्यासाची उदंचन नलिका (पंपिग मेन) टाकण्यात येत आहे.  तळवडे येथील गट क्रमांक 380 पैकी इंद्रायणी नदी लगतच 4 हजार चौरस मीटरचा भूखंड खासगी कंपनीकडून घेण्यात आला आहे. त्या जागेवर जॅकवेलचे काम काम वेगात सुरु आहे.
समाविष्ट गावांसाठी पाण्याची वाढती मागणी होती. पुरेसा आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी चिखली येथे  20 एकर जागेमध्ये जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्प मार्गी लागत आहे. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. तीन ते चार महिन्यात अशुद्ध पाणी उपलब्ध होईल. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करुन दिघी, बोपखेल, चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, मोशीसह समाविष्ट गावांना पाणीपुरवठा होणार आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत समाविष्ट गावातील नागरिकांना पुरेसा आणि मुबलक पाणीपुरवठा होईल. त्यामुळे पाणीटंचाई दूर होईल, असेही उपमहापौर घुले म्हणाल्या. तसेच भविष्यात भामा-आसखडेचे पाणीही उपलब्ध होणार आहे. त्याचेही काम सुरु आहे. या धरणातील पाणी मिळाल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण कमी होईल. त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणीपुरवठा होईल. पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ”चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्रा धरणातून नोव्हेंबर अखेर पाणी उचलण्यात येईल. चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी उचलून दिघी, बोपखेलसह समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल. या भागात पाण्याची कोणतीही समस्या राहणार नाही. शेवटचे गाव असलेल्या दिघी बोपखेलपर्यंत सर्वांना मुबलक आणि पुरेसे पाणी मिळेल”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button