TOP Newsताज्या घडामोडीपुणे

 झोपडपट्टी भागात पाणी साचण्याच्या घटना

गेल्या काही वर्षापर्यंत झोपडपट्टी भागात पाणी साचण्याच्या घटना घडत असताना आता सोसायट्यांच्या आवारातही पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यांची चुकीच्या पद्धतीने झालेली खोदाई तसेच अपूर्ण कामांमुळे रस्त्यालगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी ८० ठिकाणी पाणी साचत होते. यामध्ये आणखी ५८ ठिकाणांची वाढ झाली. वाढ झालेली सर्व ठिकाणे सोसायट्यांचा परिसर असल्याचे पुढे आले आहे.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरल्याच्या ५८ तक्रारी आल्याची माहिती देण्यात आली. वडगांवशेरी, चंदननगर, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, कर्वेनगर, कोथरूड, माणिकबाग, दत्तवाडी, रामटेकडी, हडपसर, वारजे, कर्वेनगर, बावधन, कोंढवा, येवलेवाडी, धनकवडी, ढोले रस्ता या भागातील सोसायट्यांनी पाणी साचल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

पावसाळ्यात शहराच्या विविध भागात पाणी साचण्याच्या किंवा पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात कोणत्या भागात पाणी साचते, याचे सर्वेक्षण महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केले जाते. त्यानुसार पाणी साठणारी ठिकाणे निश्चित केली जातात. यंदा १३८ ठिकाणी पाणी साठल्याच्या तक्रारी आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या. गेल्या वर्षी ८० तक्रारी आल्या होत्या. वाढलेल्या ५८ तक्रारी सोसायट्यांमधून करण्यात आल्या आहेत.

पावसाळी गटारांची अपुरी संख्या, किंवा पावसाळी गटारांचा कमी आकार, गटारात गाळ साचणे, रस्ता असमतोल असणे, रस्त्याची चुकीच्या पद्धतीने केलेली कामे यामुळे रस्त्यालगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत झोपडपट्टी आणि लगतच्या भागात पाणी साचण्याच्या घटना घडत होत्या. त्यातही नदीपात्रालगत असलेल्या झोपडपट्ट्यांच्या परिसरात पाणी शिरण्याच्या घटना सर्वाधिक होत्या. मात्र रस्त्यांचा वेगाने झालेला विकास, काँक्रिटीकरण, पावसाळी वाहिन्यांच्या अभावामुळे झोपडपट्टी भाग नसलेल्या भागातही म्हणजे बाणेर, पाषाण, औंध, कोरेगांव पार्क या भागातही पाणी साचत आहे. मुळा मुठा नदीकाठच्या सखल भागातील किमान तीन हजार नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत स्थलांतरित करावे लागत होते. ही संख्या पाचशेपर्यंत खाली आली आहे. मात्र चुकीच्या कामांमुळे सोसायट्यांना पाणी तुंबण्याच्या घटनांचा त्रास सहन करावा लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button