breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील एच.ए. मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’

सावरकर गौरव यात्रेला तोडीस तोड सभा होणार : पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी सभा घेण्याचा संकल्प

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील विरोधी पक्षांची एकजूट करुन भाजपाला आव्हान देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी ‘वज्रमूठ सभा’चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील यशस्वी सभेनंतर आता पुणे जिल्ह्यातील सभा पिंपरी- चिंचवडमधील एच. ए. मैदानावर होणार आहे. त्यासाठी स्थानिक आणि राज्य पातळीवरील महाविकास आघाडीच्या नेत्यांची तयारी सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर वज्रमूठ सभा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होणार असून, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीसमोर आव्हान निर्माण करण्यात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील सभेला स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा आठवडाभरात करण्यात येईल, असेही समजले.

काही दिवसांपूर्वी शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे शहरात भाजपाने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. आता महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.


सभेची जबाबदारी कोणावर?
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, निवडणूक प्रभारी योगेश बहल यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्यावर जबाबदारी सभेच्या तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वास्तविक, योगेश बहल, कैलास कदम आणि राहुल भोसले यांच्या प्रभागात एच.ए. मैदान असल्यामुळे या तीघांवर मोठी जबाबदारी आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी नियोजनाबाबत सतर्क आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही पदाधिकाऱ्याने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.


एच.ए. मैदानासाठी यासाठी केली निवड?
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पिंपरीत येणे सोईचे आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले ‘प्लॅनिंग’ केले होते. पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. भोसरीला लागून असलेल्या या मैदानावर गर्दी जमवणे सोपे होणार आहे. मावळातील कार्यकर्त्यांना पुण्यापेक्षा पिंपरीत येणे सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे, एच. ए. मैदानावरच शेवटची राजकीय सभा भाजपाकडून करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला उपस्थित होते. त्यानंतर या मैदानावर राजकीय सभा झालेली नाही. तसेच वंचित बहुजन आघाडीचीही सभा या ठिकाणीच झाली होती. त्यामुळे एच. ए. मैदानावर सभा घेवून भाजपा- शिवसेना महायुतीसमोर शक्तीप्रदर्शन करता येईल, असा कयास महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button