ताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरात आता पाण्यासाठी भरारी पथके

पुणे |  शहरात उन्हाचा कहर वाढला असून, पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खडकवासला धरणातून आजपर्यंतच्या इतिहासात महापालिका सर्वाधिक १६०० ‘एमएलडी’ क्षमतेने दररोज पाणी उचलत आहे. त्यानंतरही पाण्याच्या तक्रारी कायम आहेत. या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई आणि गळती शोधण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली. बाणेर-बालेवाडी परिसरात सध्या या पथकांकडून पाणी पुरवठ्याची खातरजमा करण्यात येत आहे.

बाणेर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली असून, त्यास महापालिका अधिकाऱ्यांची फूस असल्याचे कार्टून स्थानिक राजकारणातून व्हायरल करण्यात आले आहे. या विरोधात महापालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी या आरोप-प्रत्यारोपांची शहानिशा करण्यासाठी महापालिकेच्या पथकाकडून या परिसरातील पाणीपुरवठ्याची तपासणी करण्यात येत आहे. बाणेर-बालेवाडीत गेली पाच वर्षे पाणी प्रश्न नव्हता, तर आताच का, असा सवाल माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला असून, प्रतिस्पर्धी माजी नगरसेवकांना लक्ष्य करण्यात आले आहे. या दोघा माजी नगरसेवकांमधील राजकीय संघर्षात प्रशासकीय अधिकाऱ्यांना ओढण्यात आल्याने बाणेरचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा झाला आहे.

 

बाणेर-बालेवाडी परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. पाणी पुरवण्याच्या दृष्टीने शहराचा हा सर्वांत शेवटचा भाग असल्याने तेथे पाणीपुरवठ्यास मर्यादा येतात. समान पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असून, येत्या काही काळात हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. या ठिकाणाहून पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे स्थानिक अधिकारी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचून तक्रारींची शहानिशा करतात. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढून, १६०० ‘एमएलडी’पर्यंत झाली आहे. एकीकडे कालवा समितीत पुणे महापालिका सर्वाधिक पाणी वापर करीत असल्याचा ठपका ठेवण्यात येतो. त्याच वेळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिका मेटाकुटीला आली आहे. शहराच्या ‘टेलएंड’ला पाणीपुरवठा तुलनेने कमी होत असल्याने तेथून सर्वाधित तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पथके नेमून पाण्याची गळती शोधण्यात येत आहेत.

दरम्यान, शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा १६०० ‘एमएलडी’पर्यंत पोहोचला आहे. उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, असं महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button