breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात, तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

नवी दिल्ली |

सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला निरर्थक ठरवत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकल्या तर काँग्रेस प्रमुख सोनिया गांधीं २००४ च्या निवडणुकांनंतर भारताचे पंतप्रधानही बनू शकल्या असत्या असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी हॅरिस यांच्यासोबत तेथे बैठकही घेतली होती. त्यानंतर रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सोनिया गांधींनी २००४ मध्ये पंतप्रधान व्हायला हवे होते आणि जर त्या हे पद स्वीकारणार नव्हत्या, तर काँग्रेसला बळकटी देण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवे होते असे रामदास आठवले यांनी म्हटले.

“जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) २००४ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव दिला होता. माझ्या मते त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला काही अर्थ नव्हता,” असे आठवलेंनी इंदोर येथे पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. “जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी, भारताच्या नागरिक, राजीव गांधी (माजी पंतप्रधान) यांच्या पत्नी आणि लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या, पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?” असा सवालही रामदास आठवले यांनी यावेळी केला.

“पवार हे जननेते म्हणून पंतप्रधानपदासाठी पात्र होते आणि काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते, पण सोनिया गांधींनी तसे केले नाही. जर पवार २००४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आजच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. भाजपाने प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांची जागा घेतली. शरद पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या अधिकारावरून झालेल्या वादामुळे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पीए संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासह २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. दरम्यान यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडलेले ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसने केलेला अपमान लक्षात घेता त्यांनी भाजपा किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याची विनंती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. “सिंग भाजपामध्ये सामील झाल्यास पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची स्थिती मजबूत होईल,” असे आठवलेंनी यावेळी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button