TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

हल्लेखोर बिबटय़ा नेमका ओळखायचा कसा?

नागपूर : बिबटय़ांची संख्या गेल्या दशकभरात दुपटीने वाढली. सोबतच मानव-बिबटय़ा संघर्षांतही वाढ झाली. या संघर्षांत एखादा बळी गेल्यानंतर वनखात्याकडून बिबटय़ाची धरपकड मोहीम राबवली जाते. मात्र, हल्लेखोर बिबटय़ा नेमका ओळखायचा कसा, पकडलेल्या बिबटय़ांच्या पुनर्वसनाचे काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

 ‘आरे’त दीड वर्षांच्या मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर वनखात्याने बिबटय़ांना पकडण्याची मोहीम राबवली. या मोहिमेत त्यांनी एका बिबटय़ाला जेरबंद केले. तो हल्लेखोर बिबटय़ा नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून आणखी एका बिबटय़ाला जेरबंद केले. मात्र, तोही बिबटय़ा हल्लेखोर नसल्याने आता तिसऱ्या बिबटय़ाचा शोध सुरू आहे. हल्लेखोर ठरवून गेल्या काही वर्षांत जे शेकडो बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले त्यांचे काय, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी विचारत आहेत.

गेल्या दहा वर्षांत बिबटय़ांच्या जन्मदरात प्रचंड वाढ झाली. २०१८ साली झालेल्या गणनेतून हे स्पष्ट झाले. पुणे, मुंबई, नाशिक, चंद्रपूर या जिल्ह्यांत मानव-बिबटय़ा संघर्षांनंतर दरवर्षी प्रत्येकी दहा ते बारा बिबटे जेरबंद केले जात आहेत. त्यांना ठेवण्यासाठी पिंजरे शिल्लक नाहीत. एका पिंजऱ्यात दोन-दोन बिबटे ठेवले जात आहेत. मात्र, या जेरबंद मोहिमेव्यतिरिक्त वनखाते या संघर्षांवर उपाय शोधू शकले नाही. मुळात संरक्षित क्षेत्रातील आणि मनुष्यवस्तीलगतच्या बिबटय़ांच्या वर्तणुकीत बरेच अंतर आहे. त्याचाही अभ्यास व्हायला हवा. उपद्रव होत असेल तर बंदोबस्त हवा, पण त्याच्या कारणांचादेखील शोध घ्यायला हवा, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

संख्येत ६० टक्क्यांनी वाढ..

देशातील बिबटय़ांची माहिती देणारा अहवाल डिसेंबर २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार त्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली. २०१४ साली देशात सात हजार ९१० बिबटे होते. २०१८च्या अहवालानुसार देशात १२ हजार ८५२ बिबटे झाले. वाघांप्रमाणेच त्यांची संख्या सर्वाधिक असणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक आणि एक हजार ६९० बिबटय़ांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शास्त्रोक्त विचारच नाही  बिबटय़ांना पकडणे अतिशय सोपे आहे; पण जेरबंद केल्यानंतर त्यांच्या मानसिकतेचा जो अभ्यास व्हायला हवा, तो होत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील जेरबंद केलेले बिबटे पिंजऱ्यात आहेत. वाघ आणि बिबटे हे दोन्ही प्राणी अधिसूची एकमधील आहेत. वाघांच्या पुनर्वसनासाठी सरसावणारे वनखाते बिबटय़ाच्या पुनर्वसनासाठी या प्राण्याचा शास्त्रोक्त विचारच करत नाहीत. इतर अभ्यासाप्रमाणेच हा अभ्यासदेखील खात्याने केला तर आयुष्यभर पिंजऱ्यात जेरबंद राहण्याची वेळ बिबटय़ांवर येणार नाही.

– यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button