गणेशोत्सवात कर्कश आवाजामुळे मानसिक ताण, हृदय विकाराचा धोका
सण उत्सवात डीजे वाजवताना आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन
नागपूर : गणेशोत्सवात डीजे वाजविताना तसेच मिरवणुकीतून ध्वनिप्रदूषण होत असताना कर्कश आवाजामुळे मानसिक ताण वाढणे व अचानक हृदय विकाराचा झटका येऊ शकतो, तर कानाचे आजार होण्याचा धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सण, उत्सवात डीजे वाजवताना आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे. आवाजाची मर्यादा पाळावी यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. उत्सवांमध्ये आता डीजेसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे.
डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. हृदयाची गती वाढून रक्तदाब वाढू शकतो. गर्दीमुळे श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. कमजोर हृदय असलेल्यांना अशा कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ शकतो असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
आवाजाची मर्यादा किती असावी?
औद्योगिक क्षेत्र
दिवसा – ७५ डेसिबल
रात्री – ७० डेसिबल
वाणिज्य क्षेत्र
दिवसा – ६५ डेसिबल
रात्री – ५५ डेसिबल
निवासी क्षेत्र
दिवसा -५५ डेसिबल
रात्री – ४५ डेसिबल
सायलेंस झोन
दिवसा – ५० डेसिबल
रात्री – ४० डेसिबल
डीजेच्या मोठ्या आवाजाचा परिणाम कानासह हृदयावर होतो. हृदयाचे ठोके वाढतात. मेंदूकडे होणाऱ्या रक्त पुरवठ्याचा दाब वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. डीजे लावलेल्या दोन ते तीन ठिकाणी माणूस सतत उभा राहिल्यास हृदयावर परिणाम होतो.
– डॉ. आनंद संचेती, हृदयरोग तज्ज्ञ, नागपूर.
डीजेचा ७० डेसिबल मर्यादेपर्यंत आवाज कानाला इजा पोचविणारा नसतो. परंतु १०० डेसिबलच्यावर आवाजामुळे कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. यामुळे कानाचा पडदा फाटण्याची दाट शक्यता असते. बहिरेपणा येण्याची भीती असते.
-डॉ. प्रशांत निखाडे, कान नाक घसा रोग तज्ज्ञ, नागपूर.