लस अतिशय परिणामकारक असल्याचा ‘अॅस्ट्राझेनेका’चा दावा
मुंबई |
अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासात काही जणांमध्ये जादा तापाची लक्षणे आढळली असली, तरी आपली कोविड-१९ प्रतिबंधक लस अतिशय परिणामकारक असल्याचा दावा अॅस्ट्राझेनेका कंपनीने बुधवारी केला. या अभ्यासातील आकडेवारीची आपण पुन्हा पाहणी केली असून, लक्षणे नसलेल्या कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात ती ७६ टक्के परिणामकारक आहे; यापूर्वीच्या आठवड्यात दावा केल्यानुसार ७९ टक्के नाही, असे अॅस्ट्राझेनेकाने उशिरा रात्री जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे.
आपल्या लशीमुळे मिळणारे संरक्षण वाढवून सांगण्यासाठी या आकडेवारीतील सोयीस्कर भाग निवडल्याचा आरोप या अभ्यासाची पडताळणी करणाऱ्या एका स्वायत्त समितीने अॅस्ट्राझेनेकावर केला होता. या अभ्यासात नमूद केलेली करोनाची काही प्रकरणे कंपनीने वगळली होती आणि यामुळे विज्ञानावर असलेला विश्वास संपुष्टात येऊ शकतो, असे या समितीने कंपनीला, तसेच अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रातील उच्चपदस्थांना कडक शब्दांत पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. सध्या सुरू असलेल्या अभ्यासातील आकडेवारीबाबतचा वाद सहसा गोपनीय ठेवला जातो; मात्र एक असाधारण बाब म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने अॅस्ट्राझेनेकाला या विसंगतीबाबत स्पष्टीकरण देण्यास जाहीररीत्या सांगितले आहे.
वाचा- केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा आज भारत बंद!





