महापूरात बेघर झालेल्या १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून अडीच कोटीची मदत; शरद पवार यांची पत्रकार परिषदेत घोषणा…
![2.5 crore assistance to 16,000 families displaced by floods through NCP Welfare Trust; Sharad Pawar's announcement at the press conference ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-27-at-4.58.05-PM.jpeg)
मुंबई |
महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटीचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान याअगोदर मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिलेल्या बाधित क्षेत्रातील लोकांना औषधोपचार करण्यासाठी जाणाऱ्या पाच रुग्णवाहिकांना हिरवा कंदील शरद पवार यांनी दाखवला. सहा जिल्ह्यातील चार जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याबाबत राज्यसरकार धोरण जाहीर करेल. शिवाय आज काही जाहीर केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण येथे जी घटना घडली होती. त्याची माहिती देताना त्या लोकांचे कसे संपूर्ण पुनर्वसन करणं आव्हान होतं मात्र ते आव्हान पेलत पुनर्वसन करण्यात सरकार यशस्वी झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या महापूरामुळे १६ हजार घरे म्हणजेच १६ हजार कुटुंबांना मदत द्यायची गरज आहे. यामध्ये रत्नागिरी – चिपळूण – खेड यामध्ये ५ हजार, रायगड जिल्ह्यात – ५ हजार, कोल्हापूर २ हजार, सांगली २ हजार, सिंधुदुर्ग – ५००, सातारा – १ हजार आदींचा समावेश आहे.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून १६ हजार लोकांना २० हजार घरगुती भांडी, याशिवाय ज्या घरांचे नुकसान झाले त्यातील लोकांना २० हजार अंथरुण – पांघरूण कीट (सोलापूरी चादरी) शिवाय एक लाख कोरोना प्रतिबंधक मास्क, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यावतीने डॉक्टरांची २५० पथके तपासणी व औषधे घेऊन दाखल झाली आहेत. याशिवाय गंभीर रुग्णांना औषधे व रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. २० हजार बिस्किटे व टोस्ट ब्रिटानिया कंपनीकडून घेऊन वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने येत्या दोन दिवसात हे वाटप करण्यात येणार आहे.यासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी खासदार सुनील तटकरे, रत्नागिरीची जबाबदारी आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम,सिंधुदुर्गसाठी अरविंद सावंत, सातारसाठी मंत्री बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, सांगली जिल्ह्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा पातळीवर देखील पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपापल्यापरीने मदत करतील. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पूरग्रस्त भागासाठी पाच रुग्णवाहिका दिल्या असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच माजी आमदार आणि ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागाला औषधे पुरविण्याचे काम करणार आहेत.
दौरे धीर देण्यासाठी असतात. जबाबदारी दिली आहे त्यांनी कामगिरी पूर्ण करण्यासाठी काम करावे. शासकीय यंत्रणा व स्थानिक पातळीवर लोक काम करत आहेत. त्यामुळे इतरांनी दौरे करु नयेत गर्दी करु नये असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले. यावेळी खासदार सुनील तटकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार व पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे आदी उपस्थित होते