breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

ग्राऊंड रिपोर्ट: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पत्रकार परिषदेकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांची पाठ!

भाजपा प्रवेशाच्या चर्चांमुळे कोल्हेंना फटका : शहर राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदेश पातळीवर अध्यक्षपदाबाबत मोठी खलबतं सुरू असताना खासदार अमोल कोल्हे या संपूर्ण घडामोडींपासून अलिप्त आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेकडेही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोल्हे यांच्या करिता आगामी लोकसभा निवडणूक निश्चितपणे आव्हानात्मक ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा आणि शहराशी जोडून असलेला खेड विधानसभा मतदार संघात सुमारे ८ लाख मतदान आहे. २०१९ मध्ये निवडणुका झाल्यापासून कोल्हे या भागात अपवाद वगळता फिरकले नाहीत. ठरावित कार्यकर्त्यांच्या उद्घाटनांचा ‘फार्स’ सोडला, तर कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा विरोधी पक्षनेते अजित पवार शहरात आल्यानंतर जसा स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा गराडा दिसतो. तसे डॉ. कोल्हे यांच्याबाबत होत नाही.
पूर्वी अमोल कोल्हे म्हणजे शहर राष्ट्रवादीसाठी ‘फायरब्रँड’ नेता म्हणून जवळचे वाटत होते. भाजपाविरोधी डॉ. कोल्हे यांची प्रभावी वक्तृत्वाची तोफ चालवण्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठेवली होती. मात्र, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटानंतर राजकीय चित्र बदलले. डॉ. कोल्हे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्यक्रमांपासून दूर राहिले. आता महानाट्याच्या निमित्ताने पुन्हा डॉ. कोल्हे राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवर घडामोडींमध्ये कुठेही दिसत नाही. महानाट्य ‘शिवपूत्र संभाजी’ च्या प्रयोगांना महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण, डॉ. कोल्हे राष्ट्रवादीपासून दुरावत आहेत, असे चित्र आहे.


चार वर्षांचा कार्यकाळ असमाधानकारक?

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात डॉ. कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शहरात काही कार्यक्रम, बैठकांना हजेरी लावली. प्रशासनाला सूचनाही केल्या. मात्र, चार वर्षांच्या कार्यकाळात शहराचे खासदार म्हणून कोल्हे यांना पिंपरी-चिंचवडशी संबंधित एकही केंद्रातील प्रश्न मार्गी लावता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे २०१९ मध्ये स्थानिक राष्ट्रवादीसाठी ‘फायरब्रँड’ असलेले डॉ. कोल्हे आता राजकीयदृष्टया नुकसानकारक वाटतात. परिणामी, कार्यक्रम, बैठकांमध्ये डॉ. कोल्हे यांना आमंत्रित करण्याबाबत उदासीनता आहे. शहरात झालेल्या पत्रकार परिषदेला ‘नेता आणि अभिनेता’ असा रंग असला, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहराचे खासदार म्हणून उपस्थित राहणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे डॉ. कोल्हे आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकांमध्ये शहरात ‘कॅम्पेनिंग’ करतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार?

डॉ. अमोल कोल्हे भाजपात गेल्यास युतीची ताकद वाढेल. त्यांना युतीची उमेदवारी मिळाल्यास मी स्वत: त्यांचा प्रचार करेल, असा दावा माजी खासदार आणि डॉ. कोल्हे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे डॉ. कोल्हेंच्या महायुतीच्या उमेदवारीला एकप्रकारे आढळरावांनी अनुमती दिल्याचे मानले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीला शिरुर लोकसभा मतदार संघात नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सामान्य जनता आणि निष्ठावंत शिवसैनिकांची साथ आहे. तसेच, शिरुर लोकसभा मतदार संघातील सहापैकी पाच विधानसभांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते, असे भाकीत राजकीय जाणकारांनी वर्तवले आहे. त्यामुळे आगामी काळात होणारी राजकीय उलथापालथ आणि राष्ट्रवादीची भूमिका याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button