GOOD NEWS : तळवडे-मोशी रस्ता होणार आता ‘ट्रॉफीकमुक्त’
मोशी शिवरस्ता ते पुणे-नाशिक महामार्ग रस्त्याला हिरवा कंदिल

आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना दिलेला ‘शब्द’ केला पूर्ण
पिंपरी : तळवडे ते मोशी रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हिताचा ठरणारा मोशी शिवरस्ता ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्याला महापालिका प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला असून, या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिक पट्टयासह निवासी क्षेत्रातील नागरिक, वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाकडून प्रभाग क्रमांक २ मोशी गट नं. १२५२ शिवरस्ता ते गट नं. ७५२ (पुणे नाशिक हायवे) पर्यंतच्या ३० मीटर रुंद डी.पी. रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. मोशी ते देहू फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या होती. त्यामुळे हा रस्ता विकसित करण्याची आवश्यकता होती.
माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, मोशी शिवरस्ता ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण केल्यामुळे मोशी ते देहू फाटाहून चिखलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना होणारी वाहतूक कोंडीची त्रास कमी होईल. दळणवळण वाढणार असून स्थानिक शेतकरी आणि सोसायटीधारकांनाही रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच, चिखली-हवालदार वस्तीमार्गे आखणी एक नवीन रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता चिखली-मोशी रस्त्याला समांतर रस्ता म्हणून उपयोगात येईल.
आमदार महेश लांडगे यांची शब्दपूर्ती…
‘‘देहू-आळंदी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु’’ असा शब्द आमदार महेश लांडगे यांनी दिला होता. त्यानुसार, मोशी शिवरस्ता ते पुणे-नाशिक महामार्ग रस्त्याचे काम मार्गी लागत आहे. आगामी वर्षभरात रस्ता नागरिकांच्या वापरासाठी खुला होईल. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि सोसायटीधारकांसह वाहनचालकांनाही दिलासा मिळणार आहे. आमदार लांडगे यांनी दिलेला शब्द पाळला, याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया माजी महापौर राहुल जाधव यांनी दिली.