breaking-newsराष्ट्रिय

केंद्र विरुद्ध बंगाल संघर्ष शिगेला

ममतांचा भाजपवर आरोप; राज्यपालांच्या दिल्लीत गाठीभेटी

पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील स्थितीची माहिती दिली. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १२ जण ठार झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली. आपण राज्यातील स्थितीची माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली, मात्र सविस्तर तपशील आपण सांगू शकत नाही, असे त्रिपाठी यांनी वार्ताहरांना सांगितले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता त्रिपाठी म्हणाले की, भेटीच्या वेळी याबाबत चर्चा झाली नाही. राज्यात निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्या पाश्र्वभूमीवर त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली आहे.

ममतांनी राजीनामा द्यावा- मुकुल रॉय

कोलकाता : ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्यात अपयशी ठरल्या असल्याचा दावा करून, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी केली. राज्यात कायदा व सुव्यवस्था नसरी, तरी भाजप हे सरकार बरखास्त करण्याची किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही. घटनेचे कलम ३५६ लागू करण्यात आल्यास बॅनर्जी यांना मतदारांची सहानुभूती मिळेल असेही ते म्हणाले. काही पोलीस अधिकारी आदेशांचे पालन करत नसल्याचे ममता म्हणतात. त्या कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखू शकत नसतील तर त्यांनी  राजीनामा द्यायला हवा, असे रॉय म्हणाले. दंगलखोरांच्या विरोधात कारवाई न करणारे काही पोलीस अधिकारी राज्यात आहेत, या ममतांनी केलेल्या दाव्याच्या पाश्र्वभूमीवर रॉय यांनी हे वक्तव्य केले.

सरकार पाडण्याचा डाव- ममता बॅनर्जी

कोलकाता: केंद्र  सरकारवर पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असून आपले सरकार उलथून टाकण्याचा डाव आखत आहे, असा आरोप  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी येथे केला. दरम्यान, भाजपने हा आरोप फेटाळला असून पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे म्हटले आहे भाजपविरुद्ध आपण एकटय़ानेच आवाज उठविला आहे, त्यामुळे आपला आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप केला.

भाजपचा बंद

पश्चिम बंगालमधील खालावलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी राज्यात काळा दिन पाळला आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील बासीरहाट विभागामध्ये १२ तासांचा बंद पुकारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button