breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘पुष्पा’ सिनेमा पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘गँग’, प्रसिद्धीसाठी केली निष्पाप व्यक्तीची हत्या

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
दिल्ली पोलिसांनी अशा तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे की, ज्यांनी ‘बदनाम गँग’च्या नावाने आपली टोळी तयार करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी थेट एका व्यक्तीची हत्या केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी खुनाची ही घटना स्वतःच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड देखील केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोपींचा कट होता. अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ अपलोड करण्यामागे फक्त परिसरात त्याच्या नावाचीच भीती निर्माण करणं एवढाच हेतू नव्हता तर त्यांच्या टोळीची ‘बदनाम गँग’ ही ओळख निर्माण व्हावी हा देखील त्यामागे हेतू होता. चौकशीदरम्यान असे समोर आले की. ‘पुष्पा’ चित्रपट आणि ‘भौकाल’ ही वेब सीरिज पाहून अल्पवयीन मुलांना ही कल्पना सुचली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

19 जानेवारी रोजी जहांगीर पुरी पोलीस स्टेशनला फोन आला की एका व्यक्तीला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शिबू असे मृत व्यक्तीचे नाव होते.

तपासादरम्यान शिबूचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. तसेचही हत्या लुटण्याच्या उद्देशाने देखील करण्यात आली नसल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिल्ली पोलिसांना शिबूसोबत तीन मुलं भांडण करताना आणि त्याला मारहाण करताना दिसून आले.

यानंतर पोलिसांनी तिघांचीही ओळख पटवली आणि नंतर त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत पोलिसांना समजले की, तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोलीस याप्रकरणी बाल न्याय मंडळाच्या नियमानुसार कारवाई करत आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे समोर केले.

‘पुष्पा’ चित्रपट पाहिल्यानंतर बनवली गँग

प्रथमत: आरोपींचे शिबूसोबत कोणतेही वैर नसल्याचे पोलिसांना समजले. आरोपींनी काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ हा चित्रपट आणि भौकाल ही वेबसिरीज पाहिली होती. यानंतर स्वत:ची टोळी तयार करून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करावी असं या अल्पवयीन मुलांना वाटलं.

यानंतर तिघांनीही आपापली टोळी तयार केली. ज्याला त्यांनी ‘बदनाम गँग’ असे नाव दिले. 19 तारखेला त्यांनी शिबूची चाकूने हत्या केली आणि त्याच्या एका साथीदाराने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करायचा जेणेकरुन लोक आपल्याला आणि आपल्या टोळीला घाबरतील असा या तीनही आरोपींचा हेतू होता.

मात्र त्यांचा डाव यशस्वी होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या संपूर्ण घटनेची नोंद असलेला मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केला असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button