breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत गोळीबार केल्याप्रकरणी चौघांना अटक

नवी दिल्ली |

कर्नाटकात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान हवेत गोळीबार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यादगीर येथे मंगळवारी यात्रेमध्ये हवेत गोळ्यांचे काही राऊंड झाडण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन बंदुका परवानाधारक असून इतर दोन बंदुकांची तपासणी सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ढोल-ताशा वाजवून भाजपाने यात्रा काढली होती. यावेळी माजी मंत्री बाबाराव चिंचांसूर बंदूक घेऊन पोज देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. केंद्रीय मंत्री भगवंत खुंबा यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत केंद्रात नवीन मंत्री झालेल्यांची ओळख करून देण्यात आली.  कर्नाटकमधून चार भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री अनेकल नारायणस्वामी, पशुसंवर्धन राज्यमंत्री एल मुरुगन, कृषी राज्यमंत्री शोहबा करंदलाजे आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री भगवंत खुबा यांचा समावेश आहे. दरम्यान, २२ राज्यांमध्ये भाजपाकडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत ३९ केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत.

  • या मंत्र्याला बडतर्फ करा, राष्ट्रवादीची मोदींकडे मागणी…

बीदरमध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान हवेत गोळीबार करणारे मंत्री भगवंत खुंबा यांना बडतर्फ करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान मोदींकडे केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दोन बंदुका विनापरवाना असल्याची माहिती मिळत आहेत. याचा अर्थ भाजपाचे गुंड उघडपणे शस्त्राचा वापर करत असून त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. अशा प्रकारांमुळे उपस्थितांच्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र याची भाजपच्या मंत्र्यांसह कार्यकर्त्यांना तमा नाही. यात्रेत पोलीसही होते. मात्र त्यांनी त्यावेळी कोणतीच कारवाई केली नाही.

.पोलिसांनी विनापरवाना असलेल्या बंदुका का जप्त केल्या नाहीत, असा सवालही राष्ट्रवादीने केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की मंत्री खुबा यांनी हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार केलाय मात्र तो केवळ फटाक्यांचा आवाज असल्याचं स्पष्टीकरण ते देत आहेत. माजी मंत्री बाबाराव चिंचनसूर देखील हातात बंदूक घेऊन पोज देत होते. ही लोकशाही आहे की येत्या काळातील भाजपच्या राजवटीतील परिस्थितीची झलक आहे, असा सवालही राष्ट्रवादीने केला आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तींकडून असे कृत्य अपेक्षित नाही. तसेच ते माफीयोग्य देखील नाही. खुबा यांनी या चुकीची जबाबदारी स्वीकारत त्वरित राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button