breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पंकजा मुंडेंच्या ओबीसी आंदोलनापाठोपाठ आमदार धस यांचा मराठा मोर्चा

बीड |

मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. आता राज्याने विनंती याचिका दाखल केली असून यापूर्वी झालेला हलगर्जीपणा पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. भाजपनेही आरक्षण मागणीच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून मराठा समाजाचा आवाज राज्य सरकापर्यंत जावा यासाठी दि. २८ जून रोजी बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा काढणार असल्याचे भाजप आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ओबीसी राजकीय आरक्षण मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनीच भाजप आमदार सुरेश धस मराठा आरक्षण मोर्चा काढणार आहेत. बीड येथे गुरुवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार बैठकीत मराठा आरक्षण मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. भाजप श्रेष्ठींनी यापूर्वीही ऊसतोड कामगारांच्या दरवाढी संदर्भात राज्यभर आंदोलन करण्याची जबाबदारी आमदार सुरेश धस यांच्यावर सोपवली होती.

भाजप नेत्या पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांच्या नेत्या असतानाही पक्षाने धसांवर जबाबदारी देत राज्यभर दौरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमदार धस यांनीही प्रत्येक जिल्ह्यात ऊसतोड कामगार, मुकादमांच्या बैठका घेऊन दरवाढीच्या मुद्दय़ावर रान उठवले होते. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाल्या आहेत. दि. २६ जून त्यांनी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर चक्का जाम आंदोलनाच्या दोन दिवसांनंतर आमदार सुरेश धस बीडमध्ये मोर्चा काढणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाल्यानंतर सर्वप्रथम शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये पहिला मराठा क्रांती आरक्षण मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला होता. त्यापाठोपाठ आता आमदार सुरेश धस मराठा आरक्षण मोर्चा काढत आहेत. पत्रकार बैठकीत सुरेश धस म्हणाले, बीड येथे मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सुरेश धस यांनी केले. मराठा आरक्षणासह कंत्राटी आरोग्य कर्मचा?ऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील नोकर भरतीत प्राधान्य द्यावे. खते, बी-बियाणांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा. शेतक?ऱ्यांना तातडीने पीक कर्ज देण्यात यावे. रेल्वेसह सिंचनासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मावेजा तत्काळ वाटप करावा. वाळू घाट नसलेल्या तालुक्यांमध्ये शासकीय योजने अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या केल्या जाणार आहेत.

  • भाजप पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी

मराठा आरक्षण मोर्चाच्या संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मात्र या वेळी भाजपचा एकही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता. पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील गैरहजर असल्याने मोर्चा धसांचा की भाजपचा असा प्रश्न उपस्थित केला असता भाजपने मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलेला असून हा मोर्चा भाजपचाच असल्याचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे आमच्या नेत्या असून त्यांनाही मोर्चा संदर्भात कल्पना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button