TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पीठ, दूध, दहीही आता चैनीच्या वस्तू?; गृहिणींना आर्थिक गणित जुळवण्याची चिंता

मुंबईः मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या जागेची उपलब्धता नसल्याने दर महिन्याला किराणा माल विकत आणला जातो. केंद्र सरकारने २५ किलोंहून कमी पीठ, डाळी यांच्यावर तसेच दही, लस्सी यासारख्या अन्नपदार्थांवरही जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू केल्याने हे सगळेच अन्नपदार्थ आता चैनीच्या वस्तू मानून त्यांच्यावर रेशनिंग करायचे का, असा प्रश्न गृहिणी विचारत आहेत. करोना संकटाच्या आर्थिक फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना अनेकांना गेल्या वर्षी आणि या वर्षी वेतनवाढ झालेली नाही. खासगी नोकरी करताना महागाई भत्ता मिळत नाही. अशा वेळी हे अतिरिक्त खर्चिक बजेट कसे सांभाळायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

आणखी कोणत्या पदार्थांवर कशा पद्धतीने जीएसटी आकारला जाणार हा प्रश्न गृहिणींना पडला आहे. दुकानदाराने एखाद्या खाद्यपदार्थावर दोन-तीन रुपये नेहमीपेक्षा अधिक सांगितले तर ते योग्य आहेत का की जीएसटीच्या नावाखाली अधिक पैसे घेतले जात आहेत यामध्येही स्पष्टता नसल्याचे काही गृहिणींनी सांगितले. जीएसटी आकारल्यानंतर त्यानुसार मूळ किंमत अधिक जीएसटी असे बिलही ग्राहकाला मिळणार का, असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्या घरांमध्ये पोटापुरतेच कमावले जाते आणि मिळालेल्या पैशांमधून गरजेपुरते आणले जाते तिथे पीठे, डाळी, तांदूळ यांच्यासाठी एक-दोन रुपये अधिक मोजणेही कठीण असते. वस्तू संपल्या की पुन्हा मोजक्याच आणल्या जातात त्यांना जीएसटीचा हा अतिरिक्त भार पेलवणारा नाही.

अन्नपदार्थांसारख्या गोष्टी तसेच, दूध, दही या प्राथमिक आहारातील महत्त्वपूर्ण घटक असताना त्यांच्यावर कर आकारण्याचे कारण काय आणि तो लागू केल्यानंतर त्या प्रमाणात वेतनही वाढवून मिळणार का, अशी विचारणा करण्यात येत आहे. आजारी व्यक्तीसाठी नारळपाण्याचा पर्याय सुचवला जातो. या नारळाच्या पाण्यावरही जीएसटी लागू होणार आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे, आरोग्यासाठी हितकारक वस्तू यांच्या किंमतींवर नियंत्रण येण्याची गरज असताना १२ ते १८ टक्के जीएसटीचा पर्याय कसा परवडणार, याचे उत्तर अनेक गृहिणींना सापडत नसल्याचे दिसते.

सहज परवडणारे कुरमुरेही महागणार

प्रत्येक घराने महिन्याचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी खाण्याचे प्रमाण कमी करणे, अन्नपदार्थ इतर वेळपेक्षा कमी दर्जाचे घेणे, दुधामध्ये पाणी मिसळणे या पर्यायांचा अवलंब करायचा का, अशी उद्विग्नताही काही महिलांनी व्यक्त केली. कुरमुऱ्यांसारखा सहज परवडणारा पदार्थही महाग झाला तर हवा खाऊनच जगण्याची वेळ लवकरच येईल अशा संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. करोना संसर्ग व महागाईमुळे आधीच सामान्य माणूस हवालदिल झाला होता. त्यातच आता या जीएसटीच्या नव्या निर्णयामुळे आर्थिक स्थिती अधिकच खालावत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button