पिंपरी / चिंचवड

सफाई कामगाराचा मृतदेह महापालिकेच्या गेटवर ठेवून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह महापालिकेच्या मुख्य गेटवर ठेवून आंदोलन केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री पावणे आठ ते पावणेदहा वाजताच्या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय येथे घडली.

हिरामण पिंटू यादव (वय 57, रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी) असे मृत्यू झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी महापालिकेचे सुरक्षा पर्यवेक्षक दुंदाजी तारडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत हिरामण यांचा मुलगा आशिष हिरामण यादव, मुलगी रेणुका महादेव शिंदे, दुसरी मुलगी अरुणा राजू भालेराव, बाबा कांबळे, बळीराम काकडे, निलेश हाके, संतोष निसर्गंध, सदाशिव तळेकर, मधुरा डांगे आणि त्यांचे इतर साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका ग प्रभाग अंतर्गत तिरुपती इंटरप्राईजेस या ठेकेदार कंपनीकडे साफसफाई करणाऱ्या महिलांचा ठेकेदार कंपनीने तीन ते चार महिन्यांपासून पगार दिला नाही. या कारणावरून 7 मार्च दुपारी तीन वाजल्यापासून सफाई कामगार महिला महापालिकेच्या मुख्यालयात आंदोलन करीत होत्या. आठ मार्च रोजी शुभम उद्योगच्या अंतर्गत कामास असलेले सफाई कामगार हिरामण पिंटू यादव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

हिरामण यादव यांना फिटनेस प्रमाणपत्र आणल्याशिवाय कामावर घेणार नाही असे सांगितल्याने व प्रमाणपत्रासाठी धावपळ करत असताना चक्कर येऊन हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असे म्हणत त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत घालून त्यांच्या नातेवाईकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गेटवर आणून ठेवला. मुलगा आशिष आणि मुलगी आशा यांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी अशी मागणी करून ठेकेदार व सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही असा नातेवाईकांनी आग्रह केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावून सांगून देखील सुमारे दोन तास हिरामण यांचा मृतदेह आंदोलनाच्या ठिकाणी ठेवून त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार न करता मानवी विश्वाची अप्रतिष्ठा केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button