ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या बाजूने किल्ला लढवत शरद पवारांकडून राज ठाकरेंची धुलाई

कोल्हापूर  | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या शिवतीर्थावरील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील जनतेचं कौतुक करताना विकास करणाऱ्या सरकारला लोकांना पुन्हा निवडून दिल्याचं म्हणत योगींना एकप्रकारे शाबासकी दिली. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहार केला. “योगी आदित्यनाथ यांच्या ५ वर्षांच्या राजवटीत तिथल्या प्रदेशात काय काय झालं, हे साऱ्या देशाने पाहिलं. लखीमपूर, उन्नाव, हाथरस अशा घटना सगळ्यांनी पाहिल्या. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. पण मला इथं सांगायचंय की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात असं काही होऊ देणार नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने किल्ला लढवत राज ठाकरेंवर ‘पवार स्टाईल’ वार केला.

‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत २०१९ ला मोदी-शहा-फडणवीसांची इथेच्छ धुलाई करणारे राज ठाकरे काल अचानक सेना-राष्ट्रवादीवर तुटून पडले. महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला तर शरद पवार यांचं राजकारण जातीयवादी असल्याचा पुनरुच्चार केला. दुसरीकडे भाजपविरोधात मात्र त्यांनी एकही शब्द काढला नाही. उलट उत्तर प्रदेशातील योगी सरकारचं आणि तेथील लोकांचं कौतुक केलं. तिथे विकास होत असल्याचं प्रमाणपत्रही दिलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर पवारांना आजच्या कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी पवारांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक भूमिकेवर कडाडून प्रहार केला.

“कितीतरी वाईट गोष्टी सांगता येतील, ज्या योगींच्या राजवटीच्या काळात उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत आणि अशा गोष्टी घडूनही योगींची राजवट उत्तम आहे, असं जर ठाकरे म्हणत असतील तर मला काही त्यांच्यावर भाष्य करायचं नाही. पण महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात होऊ देणार नाही”, असं पवार म्हणाले. एकंदर पवारांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांच्या बाजूने किल्ला लढवत राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीवाद वाढला, असा पुनरुच्चार कालच्या सभेत राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या टीकेवरही पवारांनी त्यांना उत्तर दिलं. “ते काहीही म्हणू शकतात. त्यांच्या तोंडाला कुणी काही मर्यादा आणू शकत नाही, असं खोचक प्रत्युत्तर पवारांनी राज यांना दिलं.

शिवतीर्थावर राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला, पाहा काय म्हणाले होते.
विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांना अडीज वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा साक्षात्कार झाल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. तसंच नातेवाईकांना त्रपास देण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर राज ठाकरे यांनी पलटवार केला. “पहिल्यांदा कुटुंबाला सांग की मुंबई महापालिकेत जाऊ नका. गैरव्यवहार करायचे आणि नंतर कांगावा करायचा. ईडीची नोटीस आल्यानंतर जावं लागतं तिथे. मला नोटीस आली, ज्यानंतर मी गेलो. तुम्हाला (उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांना) ४ महिन्यांपूर्वी नोटीस येऊनही तुम्ही गेला नाहीत. नंतर ईडीने संपत्ती जप्त केल्यावर आता जाग आली”, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button