ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; रुग्णालयात जात असताना घडली दुर्घटना

 यवतमाळ| पहिले बाळंतपण माहेरी व्हावी अशी आईवडिलांची इच्छा असल्याने ती काही दिवसांपूर्वी हिंगोलीवरून मन्याळी या आपल्या गावी आली. आयुष्यातील सुखद क्षणाची वाट पाहत असताना रविवारी रात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाव दुर्गम भागात असल्याने फारशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे पालक तिला घेऊन ऑटोरिक्षातून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. पण, खड्ड्यांमुळे त्रास वाढला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ऑटोतच तिची प्रसूती झाली. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच जीव गेला.

उमरखेड तालुक्यातील टोकावरच्या ढाणकी-बिटरगाव रस्त्यावर रविवारी रात्री ही संतापजनक घटना घडली. नताशा ढोके (वय ३०) रा. मन्याळी, असे खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या आईचे नाव आहे. नताशाचा विवाह हिंगोलीतील अविनाश ढोके यांच्यासोबत झाला होता. प्रसूतीसाठी ती माहेरी मन्याळीला आली होती. गावात रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. नताशा यांना रात्री प्रसूतीकळा सुरू होताच कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला. जवळपास कुठेही संपर्क होत नसल्याने गावातील ऑटोमधून नताशाला घेऊन ढाणकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बिटरगाव-ढाणकी रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे नताशाचा त्रास अधिक वाढला. ती जिवाच्या आकांताने विव्हळू लागली. रस्त्यावरील खड्डे चुकवित ऑटोरिक्षा चालविणे चालकाला कठीण जात होते. सारे प्रयत्न करूनही ढाणकी दोन किलोमीटरवर असताना ऑटोतच नताशाची प्रसूती झाली. पण, खराब रस्ता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण दोघेही दगावले.

निवेदने, आंदोलने तरीही प्रश्न कायम

बिटरगाव-ढाणकीसह बंदी भागातील रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. अत्यवस्थ रुग्णांना ढाणकी, उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जाणेही नातेवाइकांना कठीण होते. या भागातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली. काही वेळा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर आवाहन केले. आंदोलने करूनही समस्या सुटली नाही. आता तर खराब रस्त्यामुळे बाळ-बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने समाजमन संतप्त झाले आहे.

हीच का रस्त्यांची ‘समृद्धी’?

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. पण, गावखेड्यातील साधे रस्तेही दुरुस्त केले जात नसल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हीच का रस्त्यांची ‘समृद्धी’ असा सवाल उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button