breaking-newsलेख

#FightagainstCOVID19 : खरी परीक्षा लॉकडाऊन संपल्यावरच….

कोविड 19 हा विषाणु म्हणजे काही दिवस मुक्कामाला आलेला पाहुणा नाही, की. त्याला गाडीत बसवून दिलं की आपण सुटलो असं समजायला. हा आपल्यापासून कदाचित दूर झालेला असेल, किंवा कदाचित आपल्या जवळ कुठेतरी दबा धरुन बसलेलाही असेल. तुम्ही एखादी चूक केली, थोडं गाफील राहिलात की हा हल्ला केल्याशिवाय राहाणार नाही. या विषाणुची भीती अनेक कारणांनी वाटते आहे. हा कुणालाही मृत्युच्या दारात नेऊन ठेवू शकतो. एकदा हा एखाद्यावर स्वार झाला की त्याला कुटुंबापासून, समाजापासून दूरच राहावं लागतं. दुर्दैवाने जर एखाद्याचा मृत्यु झाला तर अंत्यविधीही करण्याचा अधिकार कुटुंबीयांकडे शिल्लक राहिलेला नसतो. आपण पाहिलं आहे की अपवादात्मक घटनात कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला आहे. आपले मित्र नातेवाईक प्रयत्नपूर्वक आपल्यापासून दूर राहातात. यापेक्षा अधिक क्‍लेषकारक काय असणार? म्हणूनच हा विषाणु आपल्यापासून चार हात दूरच राहील याची दक्षता घ्यायची, आज आणि लॉकडाऊन संपल्यावरही. आता पहिल्यासारखं जगायचं नाही. आता नवे नियम, नवे विचार आणि नवी दक्षता घेतच जगण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

लवकरच लॉकडाऊन संपेल आणि हळु हळु सगळे व्यवहार सुरु होतील. तसे करावेच लागतील. आणि त्यानंतरच आपली परीक्षा सुरु होणार आहे. म्हणूनच आताच ठरवून टाकायचं की कोणकोणती काळजी घ्यायची आणि कसं कसं बदलायचं.

सगळ्यांच्या डोक्यावरचे केस कान झाकायला लागलेत. अनेकांना असं झालं असेल की मी कधी एकदाचा सलूनमधे जातोय आणि केस बारीक करुन येतोय. पण सावधान. तुम्ही केस कापणार्‍या कलाकारापासून जेमतेम काही इंचावर असणार आहात आणि तेही जवळपास अर्धातास. तुम्हाला कळणारही नाही की तो कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही.त्या खुर्चीशेजारी आणखी काही खुर्च्या असतील. त्यावरही एक एक गिर्‍हाईक आणि एकेक कलाकार असेल. त्यांच्या आरोग्याबाबतही तुम्हाला माहीत नसणार. शिवाय तुमच्या अंगावर टाकलेले कापड, वापरलेल्या कातर्‍या, वस्तारे यावर एखादा विषाणु नाही याची तुम्हाला कल्पना नसणार आहे. वरकरणी कितीही स्वच्छता दिसली, सॅनिटाईज केलं आहे तरीही खात्री देता येणार नाही. हा प्रश्न केवळ ग्राहकाचा नाही. तो कलाकार ज्याचे केस कापणार आहे त्या ग्राहकाबाबतही त्या कलाकाराला माहिती नसणार आहे. मग काय करायचं? केसांच्या जटा वाढवायच्या का? नाही. आता सध्या बाजारात बॅटरीवर चालणार्‍या मशीन आहेत. त्याचा वापर करुन घरीच कटींग करणे सोपे आहे. घरातल्या कुणाला तरी मदतीला घेतलं तर उत्तम कटिंग होवू शकते.यात सलून चालविणारांचं नुकसान होणार आहे, पण या धोकेदायक काळात याशिवाय मार्ग नाही.

लाॅकडाऊन संपल्यावर उपवास सोडायची जशी घाई होते, तशी अनेकांना अनेक प्रकारे झालेली उपासमार संपविण्याची तीव्र इच्छा होईल. एखादा आठवडा बाहेर जेवायला गेलं नाही की आयुष्यात काहीतरी विचित्र चाललं आहे असं वाटायला लागायचं इतके आपण बाहेर खाण्याबाबत आग्रही बनलो होतो. त्यामुळे लेगेच हॉटेलचा रस्ता धरु नका. तुम्हाला माहीत नाही, की तुम्ही बसत असलेल्या खुर्चीवर अगोदर कोण बसून गेलं आहे. टेबलावरचा अ‍ॅश ट्रे, टिश्युचा स्टँड हे काही सतत सॅनिटाईज केले जाणार नसतात. शिवाय भटारखाना कसा आहे तुम्हाला माहीत नाही. खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत आणून देणारा वेटर कसा आहे माहीत नाही. तुम्हाला तो डिश आणून देताना भटारखान्याच्या धुरामुळे शिंकला नसेल हे कसं समजणार? त्यापेक्षा काही महिने हॉटेल म्हणजे निशिध्द क्षेत्र समजा. तुम्ही बाहेरुन लागण घेऊन घरी आलात तर ज्यांचा काही दोष नाही अशांचं जगणं नक्कीच धोक्यात आणणार आहात. जी अवस्था हॉटेलची तीच सिनेमाची. आपण दोन महिने सिनेमावाचून जिवंत आहोतच ना? मग आणखी काही महिने तिकडे फिरकायचं नाही.

जिम जात असाल, मसाज करत असाल, फिजियोथेरपी घेत असाल तरीही तुम्ही कुणाच्या तरी खूप जवळ जात असता. ते आता काही काळ टाळा. तोंडाला मास्क लावणे हे आता आवश्यक आहे. घराबाहेर पडताना अंगात शर्ट जरी घातला नाही तरी तोंडाला मास्क आवश्यक आहे याची खुणगाठ बांधा. आता कपडे खरेदी करताना  किंवा जसा महिन्याचा किराणा भरतो तसे मास्कही नियमित खरेदी करा. फारतर आपल्या शर्टाला किंवा साडीला मॅच होणारे मास्क घ्या. आता वेगवेळ्या डिझाईनचे मास्क मिळायला लागतील. साडीसारखं आता मास्कचंही कौतुक करायला शिका.

सोशल डिस्टन्सिंगचं व्यसन लाऊन घ्या. शेखहँड हा शिष्टाचार नाही. शेखहँड हे बेजबाबदारपणाचं लक्षण समजा आणि छानपैकी नमस्कार करायची सवय लावा. प्रत्येक सोसायटीत तळमजल्यावर एक सार्वजनिक नळ उभारा आणि पूर्वी वाड्यात जाताना जसं हातपाय धुवूनच घरात प्रवेश केला जात असे तशी सवय परत लावा.

मास्क, डिस्टन्सिंग, हातपाय धुणे, बाहेरचं खाणं टाळणे अशा काही सवयी लागल्या तर केवळ कोरोनाअ काय पण इतर आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतील. तब्बेत उत्तम राहील, घरचं खाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल आणि आयुष्य निरामय बनेल.

एक बदललेली जीवनशैली स्वीकारली तर जगण्यात अधिक आनंद निर्माण होईल, आजार आणि मृत्युचं भय कमी होईल. आपण आतापर्यंत जगलो ते खरं तर स्वातंत्र्य नव्हतं. तो एक स्वैराचार बनला होता. आता काळच सांगतोय की बाबा सुधार.

लॉकडाऊन नंतरच्या परीक्षेच्या काळात आपण बदललो तर भीती उरणारच नाही.  चला मस्त जगू या, आनंदी जगू या आणि भयमुक्त वातावरणात आयुष्य उपभोगू या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button