breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे, इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासह शिरूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक उभे राहण्याची शक्यता असलेले मंगलदास बांदल यांच्यासमवेत फडणवीस यांनी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील नाराजांची मनधरणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धावाधाव करावी लागत आहे.

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. या भेटीनंतर पाटील महायुतीच्या प्रचारात उतरतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यानंतरही पाटील यांची नाराजी कायम राहिली. आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी हवी आहे. तसे आश्वासन मिळाले, तरच प्रचारात सक्रिय होणार असल्याचे पाटील सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी त्यांच्या दोनशे समर्थक कार्यकर्त्यांसह मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली. मूळचे राष्ट्रीय समाज पक्षाचे असलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या संभाव्य उमेदवार आहेत. मात्र शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पवार यांना विरोध सुरू केला आहे. भविष्यातील राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी या दोघांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर यांची मोठी खेळी, २ एप्रिल रोजी नवी आघाडी ?

अजित पवार आणि शरद पवार यांच्यासोबत संघर्ष करण्यात बराच काळ घालवला. आता महायुतीमध्ये एकत्र काम करावे लागत असल्याने कुल नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह फडणवीस यांची भेट घेतली. मात्र त्यांची नाराजी फडणवीस यांनी दूर केल्याची चर्चा आहे. भोसरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे लांडे नाराज असून ते शरद पवार यांना साथ देणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांची मनधरणी करावी लागत आहे.

स्थानिक नेते मंगलदास बांदल यांनी शिरूरमधून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर बांदल यांनाही फडणवीस यांनी बोलावून घेत चर्चा केली. बांदल यांनी त्याला दुजोरा दिला. मात्र तपशील जाहीर करण्यास नकार दिला.

राज्यातील किंबहुना जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हाती आल्यानंतर अजित पवार यांनी विरोधकांसाठी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेचे पडसाद जिल्ह्यातील राजकारणात उमटण्यास सुरुवात झाल्याने मात्र आता त्यांच्या मनधरणीसाठी धावाधाव करावी लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button