ताज्या घडामोडीमुंबई

#Explainer : लस घेतल्यामुळे नेमके कोणते फायदे? मुंबईत करोनाबाबत नवं संशोधन

मुंबई |  करोना संसर्गाच्या काळामध्ये विशेषत्वाने उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये आता करोना झालेल्या रुग्णांसह करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा नेमक्या कोणत्या कारणांमुळे मृत्यू झाला, याचा विस्तृत अभ्यास करण्यात येणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार या वैद्यकीय संशोधनाला गती मिळणार आहे.

करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे लस कशाला घ्यायची, असा अनेकांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईमध्येही दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्या मोठी आहे. लस घेतल्यामुळे करोना संसर्गाला नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने निश्चित फायदा होत असला, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्ष संशोधनाच्या माध्यमातून लसीकरणामुळे आरोग्याच्या दृष्टीने होणारे लाभ दाखवून देण्यासाठी हे संशोधन हाती घेण्यात आले आहे. लसीकरण न केल्यामुळे करोना संसर्गाची तीव्रता किती वाढली, लस घेतलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाची तीव्रता किती कमी होती, याचा विस्तृत अभ्यास यामध्ये करण्यात येणार आहे.

या अभ्यासामुळे लसीकरणामुळे किती रुग्णांना लाभ झाला, हे यातून स्पष्ट होईल. कोणत्या रुग्णांना सहआजार होते, त्या आजारांमुळे संसर्गाची तीव्रता कशी वाढली, रुग्णालयामध्ये दाखल केल्यापासून ते करोनामुक्त होईपर्यंत किती दिवसांचा कालावधी होता, याचे वैद्यकीय विश्लेषण या अभ्यासामध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिलपर्यंत ४२ हजार ६९४ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यापैकी ३८ हजार ५२ रुग्णांना वैद्यकीय उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मुंबईमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ६९ असून मुंबईबाहेरील ८२८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७४३ इतकी आहे. रुग्णालयातील एकूण उपलब्ध खाटा १ हजार ८५० असून त्यापैकी विलगीकरणासाठी असलेल्या खाटांची संख्या १ हजार ५२२ इतकी आहे. अतिदक्षता विभागातील खाटा ३२८ आहेत. रुग्णालयातील लसीकरण केंद्रामध्ये ३ लाख ८३ हजार ११४ जणांचे लसीकरण करण्यात आले.

योग्य दिशेसाठी संशोधन महत्त्वाचे

संशोधनामध्ये वैद्यकीय कारणमीमांसा नेमक्या पद्धतीने करण्यात येते. आता करोना संसर्गाची साथ नियंत्रणात आली असली, तरीही वैद्यकीय उपचारादरम्यान कोणत्या बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते, कोणत्या बाबींची पूर्तता करण्यात आली नाही, यावर विचार करून त्या अभ्यासाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्या उद्देशाने हे संशोधन महत्त्वाचे आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button