पर्यावरणपुरक गणेशोत्सव : कलाउपासक कलाकारांमुळे पिंपरी-चिंचवडचा लौकीक!
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मत : कलाकार सुधाकर शिंदे यांच्या कार्याचा सन्मान

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनेक क्षेत्रात पारंगत व्यक्ती आहेत. कलाउपासक कलाकारांमुळे शहराचा लौकीक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. कलाउपासकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपळे गुरव येथील प्रतिभावंत कलाकार सुधाकरजी शिंदे यांनी ‘‘पर्यावरणपुरक गणेशोत्सव…’’ असा संदेश देत कलकत्ता येथील बेलूर मठाची हुभेहूब प्रतिकृती तयार केली आहे. तसेच, कागदाच्या लगद्यापासून मनमोहक श्रीगणेश मूर्ती साकारली आहे. त्यांच्या निवासस्थानी जगताप यांनी भेट दिली आणि श्रींचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर उपस्थित होते. तसेच, शिंदे यांचा सन्मानही केला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते पुरस्कारप्राप्त कलाकार सुधाकर शिंदे यांनी पिंपरी येथील जयहिंद हायस्कूलमध्ये तब्बल ३६ वर्षे सेवा बजावली आहे. बेलूर मठाच्या प्रतिकृतीसाठी त्यांची ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे ते विद्यार्थी असून, १९७४ पासून कला क्षेत्रात सेवा करीत आहेत. त्यांना जिल्हा अध्यापक पुरस्कारासह आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. जुन्या काळात पुणे-पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक गणेशोत्सवांत आकर्षक देखावे उभारण्यात त्यांचा हातखंडा होता. सीता अग्निप्रवेश, ताजमहाल, दिलवाडाचे जैन मंदिर, १६ फुटी नटराज आदी देखाव्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली होती.
‘‘पर्यावरण हाच नारायण’’ या सदगुरू वामनराव पै यांच्या विचाराने प्रेरणीत होऊन कलाकार सुधाकर शिंदे कला क्षेत्रात काम करीत आहेत. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी या मठाची स्थापना केली होती. त्याची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी साकारली आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचा जीवनप्रवास जवळून पाहिलेल्या शिंदे यांच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याचा पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचा कृतीशील पुढाकार पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी आदर्शवत आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.