breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“जल्लोष शिक्षणाचा २०२४” कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिका प्रशासनाचा पुढाकार

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा जल्लोष आकाशाला भिडलेला पाहायला मिळाला. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी या कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला तसेच विविध उपक्रमांमध्ये विक्रमी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच महापालिका शाळा आणि शिक्षकांचे यश साजरे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी जल्लोष शिक्षणाचा २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शक्ती नृत्याच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरूवात झाली. त्यानंतर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध लोककलांचे सादरीकरण केले. ज्यामध्ये देशातील विविध राज्यांमधील पारंपारिक नृत्यांचा समावेश होता. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये कौतुकास्पद कामगिरी केलेल्या तसेच भारत देशाचा मान उंचावलेल्या खेळाडूंना अनोख्या नृत्याच्या आधारे मानवंदना दिली.

या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने बनविलेल्या विविध वस्तुंचे, कलांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. ज्यामध्ये टाकाऊ पासून टीकाऊ, चित्रकला, हस्तकला, विनकाम, तसेच स्वयंचलित कार, डिजीटल लर्निंग, स्वयंचलित हीटर, वैज्ञानिक प्रकल्प, स्मार्ट सिटी ई- क्लासरूम प्रकल्प, इमारतींचे तसेच रस्त्यांचे आधुनिक आराखड्यांचे समावेश असलेल्या अनेक स्टॉल्सचा समावेश होता. याव्यतिरिक्त विज्ञान प्रयोग विजेत्या शाळा, हॅकेथॉन विजेत्या शाळा, खाजगी शाळा, महापालिका सायन्स पार्क, स्मार्ट सिटी, इन्क्युबेशन सेंटर तसेच सामाजिक संस्थांच्या विविध ६० पेक्षा जास्त स्टॉल्सचा या प्रदर्शनामध्ये समावेश होता.

हेही वाचा – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा: महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांचा रौप्यमहोत्सव

जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते ज्याचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. त्यामध्ये सापशिडी, कोडे, शुटींग, बास्केटबॉल, स्लायडिंग, बॉलिंग, टॅग, ऑब्स्टॅकल कोर्स, बबल्स, बलुन टॉस, रिंग, व्हीआर व्हिडीओ गेम्स, मिनी गोल्फ इ. खेळांचा समावेश होता.

शाळा व शिक्षकांचा शालेय, आंतरशालेय, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग वाढावा तसेच विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याभोवती स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी जल्लोष शिक्षणाचा २०२४ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला आणि हस्तकला आदी विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करता यावे आणि त्यांच्या कल्पना, विचारसरणीला चालना मिळावी हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे.

जल्लोष शिक्षणाच्या दोन दिवसीय आनंदोत्सवात विविध उपक्रमांमध्ये विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शित करणारे स्टॉल्स, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गेम झोन या सर्व ठिकाणी खासगी आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये महापालिका शाळांमधील माजी यशस्वी विद्यार्थ्यांच्या चर्चात्मक संवादाचेही आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महानगरपालिका शाळेतील माजी विद्यार्थी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह अनेकांनी आपले अनुभव सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button