यामी गौतम धर आणि इमरान हाश्मी यांच्या ‘हक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
महिलेच्या हक्कांसाठीच्या लढाईची कहाणी
मुंबई : ‘हम सिर्फ मुसलमान औरत नहीं, हिंदुस्तान की मुसलमान औरत हैं, इसी मिट्टी में पले बढ़े हैं, इसलिए कानून हमें भी उसी नजर से देखे, जिससे बाकी हिंदुस्तानियों को देखता है’ (आम्ही फक्त मुस्लीम महिला नाही, तर हिंदुस्तानच्या मुस्लीम महिला आहोत. याच मातीत लहानाचे मोठे झालो, त्यामुळे कायद्यानेही आम्हाला त्याच दृष्टीकोनातून पहावं, त्या दृष्टीकोनातून सर्व हिंदुस्तानी लोकांना पाहिलं जातं) हा डायलॉग ‘हक’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधला आहे. शाह बानोच्या तिहेरी तलाकविरुद्धच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित हा चित्रपट आहे. 2 मिनिट 17 सेकंदांच्या या ट्रेलरमधील शेवटची 10 सेकंद तुम्हाला हादरवून टाकेल. आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शाझियाच्या भूमिकेत यामी गौतमची ही कहाणी मनाला भिडणारी आहे. यामध्ये अभिनेता इमरान हाश्मीने तिचा ऑनस्क्रीन पती अब्बासची भूमिका साकारली आहे.
सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित ‘हक’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात शाझिया आणि अब्बास यांच्यातील संवादाने होते. पुढे शाझिया बानो आणि तिचा पती अब्बास यांच्यातील तिहेरी तलाकची कायदेशीर लढाई पहायला मिळते. प्रत्येक शिक्षा आणि कायदा फक्त महिलांसाठीच का राखीव आहे, पुरुषांना त्यापासून का वाचवलं जातं, असा सवाल या ट्रेलरमधून उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्रविकासाचा संदेश – दिनेश यादव
1985 च्या ऐतिहासिक आणि वादग्रस्त शाह बानो प्रकरणावर या चित्रपटातून बारकाईने नजर टाकण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये कायदेशीर लढाईदरम्यान एक प्लेकार्डसुद्धा पहायला मिळतं, ज्यावर लिहिलंय ‘जेव्हा मौन सोडलं, तेव्हा इतिहास कायमचं बदलून गेलं.’ या लढाईने शाझियाच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आणले. कारण तिचे आपले लोक, तिचा समुदाय तिच्या विरोधात उभा राहिला होता. परंतु स्वत:च्या हक्कासाठी ती शेवटपर्यंत लढली.
‘हक’ या चित्रपटात यामी गौतम आणि इमरान हाश्मीसोबतच वर्तिका सिंह, दानिश हुसैन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्याही भूमिका आहे. या चित्रपटाची कथा, स्क्रीनप्ले आणि डायलॉग्स रेशु नाथ यांनी लिहिले आहेत. ‘हक’ हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.




