ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘कांतारा चाप्टर 1’च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ

'कांतारा अ लेजंड चाप्टर 1'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित

मुंबई : कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने 2022 मध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अत्यंत वेगळा विषय, त्याची उत्कृष्ट मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय या सर्व गोष्टींच्या जोरावर ‘कांतारा’ने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर त्याच्या प्रीक्वेलची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच ‘कांतारा अ लेजंड चाप्टर 1’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशन, प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि शिवकार्तिकेयन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी ताणली आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

या ट्रेलरची सुरुवात छोट्या शिवाच्या प्रश्नाने होते. दैव कोला किंवा भूत कोलादरम्यान वडील कुठे गायब झाले, असा सवाल तो करतो. त्यानंतर त्याला त्याच्या पूर्वजांची कथा सांगितली जाते. दैवी शक्तीमुळे कशा पद्धतीने त्यांनी अत्याचाराला तोंड दिलं आणि त्याचा प्रतिकार केला, याबाबत त्याला सांगितलं जातं. यामध्ये गुलशन देवैया हा एका क्रूर राजकुमाराच्या भूमिकेत आहे, तर रुक्मिणी वसंतने राजकुमारीची भूमिका साकारली आहे. या ट्रेलरच्या शेवटी ऋषभला कशा पद्धतीने सर्वांत पहिल्यांदाच दैव कोलाचा अनुभव येतो, हे दाखवलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘कांतारा’ची सुरुवात कशी झाली, याची कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

‘कांतारा चाप्टर 1’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘अंगावर काटा आला’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा चित्रपट आरामात 1000 कोटी रुपये कमावणार’ असा विश्वास दुसऱ्या युजरने व्यक्त केला. अनेकांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि थिएटरमध्ये पाहण्याविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.

‘कांतारा चाप्टर 1’मध्येही ऋषभ शेट्टीचीच मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची कथासुद्धा त्यानेच लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही त्यानेच सांभाळली आहे. तर होम्बाले फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button