मुंबई :मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध रिअॅलिटी शो **’बिग बॉस 19’**च्या घराच्या मीडिया टूरवर पाणी फिरलं आहे. जिओ हॉटस्टारकडून नियोजित असलेला मीडिया इव्हेंट मंगळवारी (१९ ऑगस्ट) पार पडणार होता, मात्र खराब हवामानामुळे आणि शहरातील विविध भागांत साचलेल्या पाण्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला.
“शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, प्रवासात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बिग बॉसच्या घराचा दौरा आणि त्यासंबंधित सर्व उपक्रम सध्या स्थगित करण्यात आले आहेत. प्रेक्षक आणि माध्यम प्रतिनिधींना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”
दिल्लीहून आलेल्या पत्रकारांना वेळेवर परत पाठवण्यात आलं, तर मुंबईत आधीच पोहोचलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. अनेक विमान उड्डाणे उशिरा होत असल्यामुळे आयोजकांनी हे पाऊल उचलल्याचं समजतं.
‘बिग बॉस 19’चा प्रीमिअर २४ ऑगस्टला होणार असून, या नव्या सिझनबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यंदाच्या सिझनसाठी खास राजकीय थीम असणार असून, सूत्रसंचालक सलमान खानने यासंदर्भात आधीच काही संकेत दिले आहेत.
दरम्यान, बिग बॉसच्या घराचे नव्याने केलेले सेटअप आणि इंटेरिअर डिझाईन पाहण्यासाठी माध्यम प्रतिनिधींमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र आता प्रेक्षकांना आणि माध्यमांना याची झलक पाहण्यासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.





