अमिताभ बच्चन यांना दिलासा; ‘प्रतीक्षा’वरील कारवाई तूर्त टळली
मुंबई | प्रतिनिधी
जुहू येथील रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी कंत्राटदार मिळालेला नाही. त्यामुळे बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भूखंडाचा भाग आम्ही ताब्यात घेतलेला नाही, असे मुंबई महापालिकेने लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ‘बिग बी’ला तूर्त दिलासा मिळाला आहे.
मुंबई महापालिका जुहू येथील रस्त्याचे रुंदीकरण करणार आहे. या रुंदीकरणात अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भूखंडाचा काही भाग घेतला जाणार आहे. त्यासाठी त्याच्या बंगल्याची संरक्षण भिंत पाडली जाणार आहे. मात्र सध्या या रस्ता रुंदीकरणासाठी कंत्राटदार मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची संरक्षण भिंत पाडून बंगल्याच्या भूखंडाचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका ताब्यात घेणार आहे, असे महापालिकेने लोकायुक्तांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
काँग्रेसच्या नगरसेविका टुलीप मिरांडा यांनी महाराष्ट्र लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी २०१७ पासून बीएमसी रस्ता रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्याकडून जमीन ताब्यात घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. त्यावर शुक्रवारी लोकायुक्तांकडे सुनावणी झाली. तेव्हा महापालिकेने कंत्राटदार मिळाला नसल्यामुळे ही जमीन ताब्यात घेतली नसल्याचे सांगितले.





