छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक
शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीय एकत्र येवून लढा उभारणार

मुंबई : छावा चित्रपट तुफान यशस्वी झाला आहे. चित्रपटाने नवनवीन विक्रम केले आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगभरातील लोकांसमोर गेला आहे. क्रूरकर्मा औरंगजेबला छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला लढा, चौफेर घेरले गेले असतानाही सर्व युद्ध जिंकणारे संभाजी महाराज, औरंगजेबकडून दिल्या गेलेल्या अनेक यातनानंतरही निडर राहत धर्माची विजयी पतका फडकवत ठेवणारे संभाजी महाराज असे अनेक रुप चित्रपटातून दिसले आहे. परंतु या चित्रपटातील काही दृश्यांवर राजे शिर्के घराण्यांच्या वारसांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राजे शिर्के घराण्याला दोषी दाखवण्यात आल्याचा आरोप करत शिर्के यांच्या वारसांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकाविरोधात लढा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिर्के यांच्या वारसांची काय आहे मागणी?
कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा संदर्भ नसताना राजे शिर्के घराण्याला दोषी ठरवून चित्रपटाच्या माध्यमातून बदनाम केल्याचा आरोप शिर्के यांच्या वारसांनी केला आहे. त्यामुळे दिग्दर्शकांवर १०० कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के घराण्याच्या वारसदारांची माफी मागितली. त्यानंतरही शिर्के घराणे आक्रमक आहेत.
हेही वाचा – बोल्हेगावातील दारूअड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त
अशी ठरवणार रणनीती
शिर्के घराणे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात एकत्र येणार आहे. शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीय एकत्र येवून लढा उभारण्याची रणनीती ठरवणार आहे. छावा चित्रपटाचा दिग्दर्शकांचा विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाई उद्यापासूनच सुरु करणार असल्याची माहिती शिर्के घराण्यातील सदस्यांची दिली. त्यासाठी शिर्के घराण्यातील सर्व सदस्य उद्या एकत्र येत आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मागितली माफी
शिर्के कुटुंबियांच्या आक्षेपानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी सर्वात आधी शिर्के कुटुंबियांची माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले, लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीवर छावा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या कादंबरीत गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचे कुलदैवत याबाबत माहिती दिली आहे. तसेच महाराजांवर आलेल्या दूरचित्रवाणी मालिकेत नाव आणि गावासकट हे सर्व दाखवले आहे. परंतु आपण छावा या चित्रपटामध्ये नावही घेतलेले नाही. तसेच गावसुद्धा दाखवले नाही. केवळ गणोजी आणि काणोजी या नावाने उल्लेख चित्रपटात आला आहे.