अर्जुनसोबतच्या नात्याविषयी ‘हे’ आहे मलायकाच्या मुलाचं मत

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त होऊन आता बरेच महिने लोटले आहेत. एकीकडे अरबाज त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. तर दुसरीकडे मलायकाला देखील नवं प्रेम मिळालं आहे. गेल्या काही काळापासून मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. मलायका आणि अर्जुन यांच्या वयामध्ये प्रचंड अंतर असल्यामुळे अनेकांनी विविध मतमतांतरे केली. मात्र या साऱ्यामध्ये मलायका- अरबाज यांचा मुलगा अरहान यांची वेगळीच प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मुलाखतीमध्ये मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्यावर अरहानची भूमिका नेमकी काय होती, हे सांगितलं आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. यावेळी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा प्रेम मिळवणं हे खास असल्याचं ती म्हणाली. ”घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम मिळणं ही फिलिंग खूप छान आणि कमालची असते. ज्यावेळी माझ्या घटस्फोट झाला त्यावेळी मी पुन्हा एका नव्या नात्यामध्ये अडकेल असं वाटलं नव्हतं. पण मला स्वत:ला दुसऱ्यांदा संधी द्यायची होती, आणि आता मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे मला पटलंय”, असं मलायका म्हणाली.
पुढे ती म्हणते, ”ज्यावेळी तुम्ही खऱ्या प्रेमामध्ये असता. त्यावेळी तुमच्यावर वयाचं किंवा अन्य कोणतही बंधन नसतं. प्रेम ही दोन व्यक्तींच्या मनातली भावना असते. आपण अशा समाजात राहतो जिथे एखाद्या मुलाने त्याच्या वयापेक्षा लहान असलेल्या मुलीला डेट केलं तर चालतं पण मोठ्या वयाच्या मुलीने वयाने कमी असलेल्या मुलाला डेट केलं तर समाजाला पटत नाही. मी अशा लोकांना फारसं महत्व देत नाही. माझ्या घरातल्यांनाही या नात्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. विशेष म्हणजे माझ्या मुलाला अरहानलादेखील या नात्याविषयी कोणतीही अडचण नाही. तो या नात्यामुळे खूश आहे. अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मी अरहानशी बोलले होते, आणि त्याला काही अडचण नसल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, २०१७ मध्ये काही वैयक्तिक कारणामुळे मलायका आणि अरबाज विभक्त झाले. त्यानंतर अरबाज त्याच्या नव्या प्रेयसीसोबत दिसून येत आहे. तर मलायका अर्जुनसोबतच्या नात्यात आहे. त्यामुळे हे दोघंही आता त्यांच्या आयुष्यामध्ये पुढील वळणावर आल्याचं दिसून येत आहे.





