TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पावसात वीज बिघाड, नागरिक हैराण

पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर विविध भागांत पाणी साचल्याने किंवा इतर तांत्रिक कारणांनी वीज यंत्रणेमध्ये बिघाड होण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. रात्र अंधारात काढावी लागल्याने नागरिक हैराण झाले. गेल्या दोन दिवसांतही शहरात तांत्रिक बिघाडाच्या विविध घटना घडल्या. दुरुस्तीची कामे पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. गुरुवारी संध्याकाळनंतर वीजवाहिन्यांतील बिघाडामुळे कात्रज-कोंढवा परिसर आणि महापारेषणच्या वीजकेंद्रातील बिघाडामुळे खडकी-बोपोडी-दापोडी आदी भागातील ग्राहकांना फटका बसला. दुरुस्तीची कामे करून शुक्रवारी टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

कात्रज कोंढवा परिसरातील पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे दोन भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी बिघाड झाला. या दोन्ही भूमिगत वाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र, दोन्ही वाहिन्या नादुरुस्त झाल्याने समस्येत भर पडली. महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामे करून वीजपुरवठ्याची पर्यायी सोय केली. यामध्ये कात्रज-कोंढवा २२ केव्ही वाहिनीवरील सर्व परिसराचा वीजपुरवठा भिलारेवाडी वीजवाहिनीद्वारे सुरू करण्यात आला. मात्र गोकुळनगर, शिवशंभो गल्ली क्र. २ ते ४, पॅरामाउंट गार्डन, पॅरामाउंट इरोस, माउलीनगर, समर्थनगर, राजमाता कॉलनी, आंबेडकरनगर, टिळेकरनगर या परिसरातील सुमारे २२०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही. कर्मचाऱ्यांनी रात्रभर दुरुस्तीचे काम करून शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.

खडकी येथे महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रात झालेल्या बिघाडामुळे महावितरणचा दापोडी ११ केव्ही वीजवाहिनीचा वीजपुरवठा बंद राहिला. यासह पावसाची हजेरी आाणि साचलेल्या पाण्यामुळे या वीजवाहिनीमध्ये विविध ठिकाणी तसेच फिडर पिलर बॉक्समध्ये आर्द्रता निर्माण होऊन एकामागे एक बिघाड होत गेले. महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करीत दापोडीमधील गणेशनगर, आनंदवन, सुंदरबाग, गगनगिरी या परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी साडेतीनपर्यंत पूर्ववत केला.

२२ तास वीजबंद, पर्यायी व्यवस्था नाही…
खडकी येथील उपकेंद्रात गुरुवारी संध्याकाळी मोठा बिघाड झाल्याने खडकीपासून बोपोडी, पुणे-मुंबई महामार्ग आणि दापोडीतील वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीनंतर मध्यरात्री काही भागांत वीज आली, पण एकापाठोपाठ एक वाहिन्यांमध्ये आर्द्रतेमुळे बिघाड निर्माण झाला. दापोडीच्या नेहरू चौकात अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेल्या पिलरमध्ये मोठा बिघाड झाला. रात्रभर या सर्वांची दुरुस्ती झाली. पण, काही भागांतच वीज आली. पुन्हा सकाळपासून कामे करून दापोडीतील गणेशनगर, आनंदवन, सुंदरबाग आदी भागातील वीज २२ तासांनंतर शुक्रवारी दुपारी साडेतीननंतर पूर्ववत होऊ शकली. या भागाला पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याची महावितरणची कोणतीही यंत्रणा नसल्याचा मुद्दाही पुन्हा समोर आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button