जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
उपचारास दिरंगाई केल्याचा आरोप करत नातेवाईकांचा गोंधळ; गुंतागुंत झाल्याने घटना घडल्याचा रुग्णालयाचा दावा

पिंपरी : नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याने नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर बाळाच्या नाळेला गुंतागुंत झाल्याने घटना घडल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या बाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आईला प्रसूती वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी (दि. 23 सप्टेंबर) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधीत महिला 38 आठवड्यांची गरोदर होती. त्या महिलेने तीव्र वेदना आणि पेटके येत असल्याची तक्रार केली होती. परंतु डॉक्टरांनी तिला प्रसूतीसाठी दाखल केले नाही, अशी तक्रार नातेवाईकांनी केली. सामान्य प्रसूती शक्य नसल्यास सी-सेक्शन करण्याची विनंती केली. मात्र दोन्ही वेळा डॉक्टरांनी उद्धट उत्तरे दिली.
नियमानूसार त्वरीत सीझर करण्यासाठी न घेऊन जाता रुग्णालयामार्पत तपासणी करण्यात आली. तीव्र वेदनेनंतर सुरू झाल्यानंतर प्रसूतीसाठी नेण्यात आले. प्रसूतीसाठी घेऊन जाण्यापूर्वी, डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली. मात्र नाळेला दोन गाठी असल्याने रक्तपुरवठा कमी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे बाळाला ऑक्सिजन कमी पडू लागला. त्यानंतर 15 मिनिटांनंतर बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झाले असल्याचे सांगत डॉक्टरांनी बाळ मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.
या बाबत संबंधीत नातेवाईकांनी रुग्णालयाकडे लेखी तक्रार दिली आहे. उद्धट वागणार्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
पोटात दुखत असल्याने संबंधीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. नियमानूसार नॉर्मल प्रसूतीची वाट पाहिली. मात्र वेदना वाढल्यानंतर त्वरीत सीझरसाठी घेऊन गेले होते. मात्र बाळाच्या नाळेला दोन गाठी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रक्तपुरवठा पुरेसा न झाल्याने ही घटना घडली.
– डॉ. नागनाथ यल्लमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक.