breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवार गटाचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल!

मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवार यांना लक्ष केलं आहे. दरम्यान, अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या राजकीय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवारांसारख्या उंचीचा नेता देशात नाही असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही शरद पवारांना बहुमत दिलं नाही, त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. ममता बॅनर्जी होतात, मायावती होतात. अनेक राज्यांमधले प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. पण आपले उत्तुंग नेते असताना आम्ही काही ठराविक आकड्यांपुढे जाऊ शकत नाही. आमचे जास्तीत जास्त ६०-७० आमदार निवडून येतात. कुणाशीतरी आघाडी करावी लागते.

हेही वाचा – ‘स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष’; एकनाथ शिंदे

आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. चिन्ह कुणाला मिळेल, नाव कुणाला मिळेल याचा निर्णय निवडणूक आयोगात होईल. त्याचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ होऊ शकते. हा निर्णय मतदार करत असतो. आपला वैयक्तिक निर्णय त्यात कुणाचाही नसतो. आता पुढे काय होईल, ते जसजशा घटना घडतील, तसतसं स्पष्ट होत जाईल, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वळसे पाटील यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. मला आश्चर्य वाटतंय. तुम्हीही शरद पवार यांच्या आसपासचे नेते होता, तुम्ही का नाही जबाबदारी पार पाडली असं लोक म्हणतील तेव्हा वळसे पाटील यांच्याकडे काय उत्तर असेल असा सवाल रोहित पवार यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button