ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका रुग्णालयांमधील सेवा-सुविधांबाबत ‘ऑडिट’ करा!

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची मागणी

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

नांदेड, ठाणे आणि नागपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांमधील औषध साठा, सेवा-सुविधांबाबत ‘ऑडिट’ करा आणि रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील, याची काळजी घ्या, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडची ही घटना ताजी असतानाच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४३, तर मेयो रुग्णालयात १६ असे एकूण ५९ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.या पूर्वी ऑगस्ट मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – नांदेड मृत्यूप्रकरणावरून उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले,..

राज्यातील या तीनही घटना पाहता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था, सेवा-सुविधा यांचा आढावा घ्यावा. या रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरासह, पुणे आणि इतर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. नियमित दीड हजारापेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची नोंद आहे. रुग्णालयावर उपचाराचा अतिरिक्त ताण येत आहे. यासह महापालिकेच्या विभागीय दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औषध साठा, उपलब्ध मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रणा याचे प्रशासनाने ऑडीट करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे, असे दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

शहराची आरोग्यवाहिनी असलेल्या वायसीएम रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी. रुग्णालयात रेडिओलॉजिस्टचा अभाव आहे. ते येण्यासाठी प्रयत्न करावेत. या बरोबरच सोनोग्राफी, एक्स-रे साठी अत्याधुनिक मशिनरीचा पुरवठा करावा. वर्ग १ ते वर्ग ४ ची सर्व रिक्त पदे भरावीत. याबरोबरच महापालिकेच्या इतर रुग्णालयांना वायसीएम प्रमाणे आणखीन सुसज्ज बनवून सुविधा द्याव्यात. त्यामुळे वायसीएमचा ताण कमी होऊन दुर्घटना टाळण्यास मदत होईल. या सर्व घटनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून पाऊले टाकावीत, अशी मागणी प्रशासनाला केली आहे.

दीपक मोढवे-पाटील, शहराध्यक्ष, वाहतूक आघाडी, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button