TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

शापित पवना : बेजबाबदार प्रशासन; मश्गुल राजकारणी अन्‌ रामभरोसे पिंपरी-चिंचवडकर!

सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात : महायुतीच्या सत्तेत नदी सुधार प्रकल्प ‘बुडाला’

पिंपरी: राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे शहरातील प्रस्थापित नेते, पदाधिकारी यांचे सरकार असताना पवित्र पवना नदी ‘शापित’ आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारा रावेत बंधारा याच नदीवर आहे. पण, रसायन आणि सांडपाणी-मैलामिश्रीत पाणी नदीपात्रात थेटपणे सोडले जाते. त्यावर प्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडे नाही. पिण्याचे पाणी दुषित होते आहे. नदी पात्रातील जलसृष्टी अक्षरश: संपलेली आहे. मात्र, स्मार्ट सिटी आणि विकसित शहराच्या बढाया मारणारे स्थानिक नेते सत्तेत मश्गुल आहेत. प्रशासन बेजबाबदार आणि पिंपरी-चिंचवडकर रामभरोसे आहे, अशी खंत सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली पवना नदी फेसाळली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार यांनी नदी सुधार प्रकल्प हाती घेतले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ढिम्म प्रशासन नदी सुधार बाबत कुठलीही कार्यवाही करत नसल्याने पवनामाईची पुरती वाट लागली आहे. नदी पात्रात केमिकल युक्त पाणी मिश्रित झाल्यामुळे थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात फेसाळलेले पाहायला मिळत आहे.

थेरगाव येथील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळल्याचे चित्र आहे. पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांनी प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. शहरातील ड्रेनेजचे पाणी कुठलीही प्रक्रिया केल्याशिवाय थेट नदीत सोडले जाते. तसेच रसायन मिश्रित पाणी देखील नदीत मिसळले जाते. यामुळे पवना नदीची दुरवस्था झाली आहे. जलपर्णी वाढणे, पाण्यावर फेस येणे, हे प्रकार सातत्याने सुरु आहेत. नदीचे आरोग्य बिघडल्याने त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर देखील होणार आहे.

वास्तविक, पवना नदीचे संवर्धन करण्यासाठी नदी पात्रात थेटपद्धतीने सोडण्यात येणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी आणि रसायनमिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाकडे रावेत, किवळे, ताथवडे आणि मामुर्डी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, प्रशासनाने यावर कार्यवाही करण्याबाबत कानाडोळा केला आहे.

पिंपरी-चिंचवडकर माफ करणार नाही…
राज्यात सत्तेत असलेले खासदार श्रींरग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप आणि आमदार उमा खापरे यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत गांभीर्याने विचार करणे अपेक्षीत आहेत. उच्च विद्याविभूषित सनदी अधिकारी आयुक्त तथा प्रशासक सध्या शहराचे पालक आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. मात्र, या पैकी एकाही नेत्याला किंवा आयुक्तांना पवना प्रदूषणाबाबत विचार करायला वेळ नाही. शहराचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या नेते आणि अधिकाऱ्यांनी नदी प्रदूषणाबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करणे अपेक्षीत आहे. अन्यथा पिंपरी-चिंचवडकर तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत, याचे जाणीव ठेवली पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button