breaking-newsमहाराष्ट्र

#Coronolockdown:रत्नागिरीत ऑनलाईन मद्य विक्रीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : दुकानांसमोरील गर्दी लक्षात घेता रत्नागिरीत ऑनलाईन मागणीतून घरपोच मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे .  जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अखेर आज (6 मे) रत्नागिरीत ऑनलाईन मद्यविक्री करण्याचे आदेश दिले आहेत. दुकानांसमोर होणारी गर्दी टाळण्यासाठीच ऑनलाईन विक्रीचा मार्ग निवडण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना घरपोच दारु मिळणार आहे. कोरोनाचे संक्रमण टाळत सर्व नियमा पाळून ही ‘ऑनलाईन’ मद्यविक्री होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन कालावधीतील बंद असलेल्या मद्यविक्रीची दुकाने पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. परंतु प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्यानुसार, इतर जिल्ह्यातील घटनांवरुन थेट मद्यविक्री केल्याने मोठी गर्दी उसळून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोव्हिड – 19 या विषाणुच्या संसर्गाचा धोकाही वाढला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ घरपोच मद्यविक्रीची सेवा देणेच योग्य आहे, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी जिल्हयातील एफएल 2, सीएलएफलटिओडी 3 , एफएलबीआर 2, या किरकोळ मद्य विक्री करणाऱ्यांना शारिरीक अंतर राखून सीलबंद मद्याची विक्री करता येणार आहे. ग्राहकांना घरपोच मद्य परवठा करण्याला मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामीण क्षेत्रातील एफएल 2, सीएलएफलटिओडी 3, एफएलबीआर 2, सीएल 3, सीएलबीआर 2 या किरकोळ मद्यविक्री करणाऱ्यांवर काही निर्बंधही टाकण्यात आले आहेत. कोव्हिड – 19 या विषाणुचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आणि मद्यविक्री करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी थेट दुकानांमधून मद्याची विक्री करता येणार नाही. त्याऐवजी गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन फॉर्म भरुन आणि दुरध्वनी/मोबाईल/व्हॉट्सअॅप/मॅसेज इत्यादीद्वारे ग्राहकांकडून मद्याची मागणी स्वीकारली जाईल. त्यानुसार सीलबंद बाटलीतून मद्याची घरपोच सेवा पुरवण्यात येईल.

यासाठी विक्रेत्यांना प्रशासनाने अटी शर्ती घातल्या आहेत त्याप्रमाणे दुकानाच्या दर्शनी भागात मोबाईल नंबर, गुगल फॉर्म लिंक , व्हॉट्सअॅप नंबर इत्यादी मोठ्या अक्षरातील फलक लावण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना मद्यविक्रीची सेवा घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती देखील ग्राहकांपर्यंत एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपनेच करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. घरपोच मद्य विक्रीसाठी जबाबदार व्यक्तीची माहिती देवून घरपोच सेवा देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासाठी अधिकृत पास अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून मिळणार आहे. मद्यविक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दुकान चालकांना खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मद्य घरपोच मिळणार असलं तरी मद्याच्या किमतीमध्ये वाढ होणार नाही. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या तरतुदीचा भंग होणार नाही याची दक्षता विक्रेत्यांनी घ्यावी, असं जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button