breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: मला सामान्यांप्रमाणे क्वारंटाइनमध्ये ठेवलं तर…; भाजपाचा केंद्रीय मंत्र्याचा अजब दावा

केंद्रीय मंत्री डी. व्ही  सदानंद गौडा मंगळवारी दिल्लीवरुन बंगळुरुमध्ये दाखल झाले. मात्र नव्या नियमांनुसार क्वारंटाइन होण्यास त्यांनी नकार दिला. आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ त्यांनी माझ्यासारख्या महत्वाच्या व्यक्तींना या नियमांमधून वगण्यात आल्याचा युक्तीवाद केला. आपण औषध प्रशासनासंदर्भातील मंत्री असून ती अत्यावश्यक सेवेत येत असल्याने आपल्याला वगळण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

कर्नाटक सरकारनेही गौडा यांची बाजू घेतली असून केंद्र सरकारने औषधांसारख्या महत्वाच्या क्षेत्रासंबंधित काम करणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइनसंदर्भातील नियमांमधून सूट दिली आहे असं सांगितलं आहे. सोमवारपासून विमान प्रवास सुरु झाल्यानंतर गौडा हे दिल्लीवरुन बंगळुरुला आले. त्यानंतर त्यांनी कर्नाटक सरकारने आखून दिलेल्या नव्या क्वारंटाइन सुचनांचे पालन न करता थेट आपल्या खासगी गाडीमधून घर गाठले. गौडा यांनी क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर सोशल मिडियावरुन यासंदर्भात अनेकांनी आक्षेप नोंदवला. अनेकांनी सोशल मिडियावरुन नियम केवळ सामान्यांसाठी असून महत्वाच्या तसेच अती महत्वाच्या व्यक्तींना आणि नेत्यांना यामधून सूट देण्यात येत असल्याची टीका केली.

राज्य शासनाने जारी केलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार (एसओपी) कोविड -१९ चा प्रादुर्भाव असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधून येणार्‍या प्रवाशांना सात दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र गौडा यांनी स्वत:ला क्वारंटाइनमध्ये जाण्यास नकार दिला आहे. गौडा यांनी स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करताना आपण औषधे (फार्मास्युटिकल्स) विभागाचे प्रभारी मंत्री असून हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते. अशा सेवांसंदर्भातील व्यक्तींना क्वारंटाइनच्या नियमांमधून सूट देण्यात आली असल्यानेच मला विमानतळावरुन जाऊ देण्यात आल्याचे गौडा यांनी सांगितलं.

मला सामान्यांप्रमाणे क्वारंटाइनमध्ये ठेवलं तर काम कोण करणार अशापद्धतीचा प्रश्न गौडा यांनी स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करता उपस्थित केला आहे. “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी काम करावं असं तुम्हाला वाटतं बरोबर ना? पण जर कोणीच बाहेर आलं नाही आणि काम केलं नाही तर हे थांबवता येणार आहे का? औषधांशी संबंधित मंत्री म्हणून उत्पादन, पुरवठा यासारख्या गोष्टी तपासणे महत्वाचे आहे. या गोष्टी अगदी शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहचल्या की नाही याची खात्री करुन घेणं माझं काम आहे. ही माझी जबाबदारी आहे,” असं सांगत रसायन व खत मंत्री असणाऱ्या गौडा यांनी आपली बाजू मांडली.

“मी सवलतीच्या नियमांखाली येथे आलो आहे आणि त्यामुळेच मला सूट देण्यात आली आहे. माझ्या फोनवर आरोग्य सेतु अॅपवरुन मी सुरक्षित असल्याचेही दाखवले आहे. प्रत्येक गोष्टी तपासून घेतल्यानंतर आपण जबाबदारीनेच वागतो. आम्ही आमच्या इच्छेनुसार फिरलो तर मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी ) देखील आम्हाला सोडणार नाहीत, (ते आमच्यावर कारवाई करतील)”, असं गौडा पुढे म्हणाले.

कर्नाटकातील राज्यमंत्री  आणि कोवीड-१९ संदर्भातील राज्याचे प्रवक्ते एस. सुरेश कुमार यांनी, “औषध क्षेत्राचे मंत्री म्हणून काम करणारे मंत्री म्हणू त्यांना सूट देण्यात आली आहे. (या संदर्भात) केंद्र सरकारने आधीच आदेश जारी केले आहेत” अशा शब्दांमध्य गौडा यांना देण्यात आलेल्या विशेष अधिकाराची माहिती दिली.

त्यानंतर सोमवारी राज्यातील मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीमध्ये गौडा यांनी विमातळावरुन निघण्यापूर्वी माझ्या शरिराचे तपमान तपासण्यात आल्याची माहिती दिली. मी कोणाच्याही संपर्कात आलेलो नाही. मी ज्या विमाने आलो त्यात केवळ ११ प्रवासी होते, अशी माहिती गौडा यांनी दिली. खासगी विमानाने येण्याचा निर्णय आपण रद्द केल्याचे सांगताना गौडा यांनी, “मी वस्तूंचा गैरवापर करणारा व्यक्ती नाही. त्यामुळेच मी विमानसेवा सुरु होण्याची वाट पाहिली,” असं सांगितलं.

कर्नाटक सरकारने हवाई मार्गाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार सहा राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी नकारात्मक आल्यानंतरही त्यांना सात दिवस क्वारंटाइनमध्ये थांबावे लागणार आहे. तर इतर राज्यांमधून येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे.

तातडीच्या कामासाठी येत असलेल्या व्यावसायिकांनी प्रवासाच्या तारखेच्या दोन दिवस आधी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा सीओव्हीआयडी -१९ नकारात्मक चाचणी अहवाल सादर केल्यास त्यांना क्वारंटाइनमधून सूट देण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button