breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: “मदत केली तर ठीक, अन्यथा…”, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली असून यावेळी त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी भारताने मदत नाही केली तर काही हरकत नाही, पण मग त्यांनी आमच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवू नये असं म्हटलं आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत करोनाविरुद्ध लढ्यात मदतीची विनंती केली होती.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केलात तर आम्ही तुमचे आभारी असू असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नाही, तरी काही हरकत नाही. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, आणि ते आम्ही का करु नये ?”.

करोनाने अमेरिकेत थैमान घातलेलं असून तीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेला करोनाचा खूप मोठा फटका बसला आहे. करोनावर लस मिळावी यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर जगभरातील वैज्ञानिक यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७३ हजार ७५० वर पोहोचली आहे. दरम्यान जगभरात १३ लाख २८ हजार १५० जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन लाख लोकांना उपचार करुन घरी पाठवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे भारतात ४७७८ लोकांना करोनाची लागण झाली असून मृतांची संख्या १३६ वर पोहोचली आहे.

अमेरिका करोनावर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा वापर करण्यावर भर देत आहे. भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध प्रभावी ठरलं होतं. भारतात आजही अनेक लोकांना मलेरिया हा आजार होत असतो, यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात या औषधाचं उत्पादन करत असतात. हेच औषध सध्याच्या घडीला करोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे, हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या मागणीत वाढ झालेली आहे. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प भारताकडे यासाठी विनंती करत आहेत.

दरम्यान कच्च्या मालाच्या अभावापोटी भारतातही या औषधाचं उत्पादन कमी झालेलं आहे. सध्या जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे भारतातील औषध कंपन्यांनी या औषधासाठीचा कच्चा माल एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button