breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: बापरे! एका चुकीमुळे कुटुंबातील २० जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू
मध्य प्रदेशमधील इंदूर शहराजवळ लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी उपस्थित असणाऱ्या एकाच कुटुंबातील २० जणांना करोनाचा लागण झाली आहे. इंदूरजवळील सानवर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वाढदिवसाच्या पार्टीनंतर कुटुंबातील ७० वर्षीय महिलेचा सात दिवसानंतर मृत्यू झाला आहे. ही पार्टी १६ मे रोजी झाली असली तरी हा संपूर्ण प्रकार आता उघडकीस आला आहे. २३ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या शरिरातील स्वॅबची चाचणी करण्यात आली असता ती करोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली असता कुटुंबातील १९ जणांना करोनाचा लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.