breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Coronavirus: पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय? – शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी भारताने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र यावरुन शिवसेनेने पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय? असा सवाल सामना संपादकीयमधून विचारला आहे. “पंतप्रधानांनी सरकार काय करत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. जेव्हा देशात एकही कोरोना रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणार्‍या लोकांची चाचणी सुरू केली आहे. आता सत्य असे आहे की, २१ दिवसांपूर्वी ‘लॉकडाऊन’ सुरू झाले तेव्हा संपूर्ण देशात ५१६ कोरोना रुग्ण होते. ते आता १२ हजारांवर गेले आहेत. दुसरे असे की बाहेरून येणार्‍या लोकांची चाचणी सुरू केली हे खरे असेल तर ५६ देशांतून लोक दिल्लीतील ‘मरकज’ला पोहोचले कसे? हा प्रश्न आहेच. पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय?,” असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

राज्यांना कमजोर करून व मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करून कोरोनाशी लढता येणार नाही. राज्यांनीच लढायचे आहे व पंतप्रधानांनी मार्गदर्शन करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात व सांगतात तसेच मोदी बोलले. त्यांच्या चेहर्‍यावर थोडी चिंता होती, पण त्यांनी देशाला विश्वास दिला. हा विश्वास पुढच्या युद्धासाठी महत्त्वाचा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.


“संकटे येतात आणि जातात. ‘महाभारत’ आणि ‘पानिपता’तून उभे राहिलेले हे राष्ट्र ‘करोना’विरुद्धच्या युद्धात त्याच जिद्दीने लढताना दिसत आहे. करोनाचा हल्ला हा फक्त सर्जिकल स्ट्राईकचा प्रकार नाही. हे संपूर्ण युद्ध आहे. त्यामुळे युद्धाचे जे परिणाम-दुष्परिणाम दिसतात ते या युद्धात दिसू लागले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जे भाषण केले त्यावर विरोधकांनी अकारण टीका करण्याचे कारण नाही. मोदी यांनी ३ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविले आहे. म्हणजे युद्धाचा कालावधी वाढवला आहे व १३० कोटी लोकांना ३ मेपर्यंत शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे घरातच बसून राहावे लागेल,” असं सांगण्यात आलं आहे.

“महाराष्ट्रासारख्या राज्यात काल दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त सापडले हे चिंता वाढवणारे आहे. देशात बारा हजार कोरोनाग्रस्त आले कुठून व आतातरी हा आकडा खरा आहे काय? याबाबत लोकांच्या मनात संभ्रम दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण हे अधिक संयमी, जनतेला विश्वासात घेऊन काही सांगू पाहणारे होते. एका वाक्यात सांगायचे तर श्री. उद्धव ठाकरे यांच्या धाटणीचे होते. गोरगरिबांना नोकरीवरून काढू नका हे त्यांचे आवाहन दिलासा देणारे आहे व या गोष्टीकडे सरकारने एका जाणिवेने पाहायला हवे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“पंतप्रधान मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे. पण मध्यप्रदेशसारखे राज्य कोरोनाविरुद्धच्या लढाईत खूपच मागे पडले आहे व तेथे संपूर्ण सरकार नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाही. तेथील काँग्रेसचे सरकार पाडून भाजपाने आपला मुख्यमंत्री बसवला, पण मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे एकटे शिवराजसिंह चौहानच इकडेतिकडे धावत आहेत. हे राजकारण थोडे पुढे ढकलता आले असते. महाराष्ट्रात पंतप्रधान मदतनिधी की मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा घोळ घातला गेला आहे. हा गोंधळ टाळता आला असता. राज्यांना कमजोर करून व मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करून कोरोनाशी लढता येणार नाही. राज्यांनीच लढायचे आहे व पंतप्रधानांनी मार्गदर्शन करायचे आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button